एक स्वर्गीय अनुभव- केदारनाथ (भाग २ )

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 18/07/2025 1:59 AM

एक स्वर्गीय अनुभव- केदारनाथ (भाग २ )
केदारनाथ दर्शनाचा लेख लिहिण्यास घेतला. कुठलाही अनुभव सांगणं /लिहिणं म्हणजे त्या अनुभवांची उजळणी असते. अनेक  वर्षांपासून पाहिलेली वाट, भेटीची तळमळ व तीव्र ओढ. या यात्रेच्या निमित्ताने सत्यात उतरली तर दुसऱ्या क्षणी जाणवत होत खरंच नक्की कोणत्या जन्माच पुण्य आहे की भोलेबाबांच्या कृपेचे मेघ माझ्यावर बरसले, दर्शनाचे सौभाग्य मला प्राप्त झाले.  हा लेख लिहिताना काही चुका झाल्यास. तुम्ही माझ्या चुका पदरात घ्या ही नम्र विनंती. 
. भगूर रत्न हभप गणेश महाराज करंजकर ट्रस्ट यांचा केदारनाथ बद्रीनाथ चारधाम यात्रेचा आकर्षण बिंदू म्हणजेच केदारनाथ धाम. आज सर्वच सहप्रवाशांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह जाणवत होता. आम्ही जेथे रात्री मुक्कामाकरिता थांबलो जय अंबे माता हॉटेल तेथे पोहोचल्यानंतर सर्वांनी रूम मध्ये जाऊन फ्रेश झाले व तेथूनच खऱ्या अर्थाने महाराजांच्या संगीतमय कथेला सुरुवात झाली. कथेमध्ये महाराजांनी सर्व तीर्थांचे महत्त्व व माहिती सविस्तरपणे सांगितले. कथे दरम्यान गायनाची साथ हभप शिवराम महाराज बोराडे तर मृदुंगाची साथ ह भ प केशव महाराज करंजकर यांनी अप्रतिम अशी साथ दिली. त्यांना सहगायक म्हणून मी. प्रवीण. वसंतराव. आडके दाजी. आम्ही सर्व त्यांना गायना दरम्यान साथ देत होतो. तसेच तेथील सर्व कथेची व्यवस्था व माइक सिस्टीम यांचे नियोजन. दिगंबर. दत्तू. शरद. यांनी उत्तमरीत्या पार पाडली. रात्रीच्या जेवणाच्या दरम्यान चंदू नाना . व सुधाकर तात्या यांनीही मोलाची साथ दिली. रात्रीचे जेवण आटोपले आणि आयोजकांनी सांगितले, 'मध्यरात्री ३ वाजता आपण सोनप्रयागकडे प्रयाण करू. लवकर निघालो तर सोनप्रयागला गर्दी कमी लागेल व आपल्याला गौरीकुंडाकडे नेणाऱ्या शटल सेवेसाठी (ट्रॅक्स) आपल्याला भली मोठी रांग लावावी लागणार नाही. गौरीकुंडला लवकर पोहोचलो, तर चढाई करणे सोपे होईल.
थोडा आराम व्हावा म्हणून आम्ही रूमवर आलो, बॅगा भरल्या. थोडा आराम करून आम्ही रात्री ४ वाजता सीतापूरहुन सोनप्रयागला निघालो. भर पावसामध्येच पाच किलोमीटर अंतर पार करून आम्ही सोनप्रयागला पोहोचलो. तेथे पोहोचल्यानंतर आम्हाला समजले की दरड कोसळल्यामुळे रात्रीच रस्ता बंद झालेला आहे आम्ही तेथे दोन ते अडीच तास थांबून रस्ता चालू होण्याची वाट बघत होतो. तेथे आयोजकांनी दोन ग्रुप बनवले एक ग्रुप जो घोड्यावरती जाणार होता तर दुसरा ग्रुप जो पायी जाणार होता. मूळ रस्ता बंद असल्याकारणाने व्यवस्थापक वाईकर यांनी गोरी कुंडाकडे जाण्यासाठी दुसरा मार्ग शोधला. त्या मार्गाने आम्ही गौरीकुंडाकडे निघालो. गौरीकुंडापर्यंत पोहोचण्यासाठीच आम्हाला पाऊलवाटेने अनेक चढ उतार पार करावे लागले .” भोले बाबांची असीम कृपा दुसरं काय!
काही अंतर पार करून आम्ही केदारनाथ प्रवेशद्वाराशी आलो. . सोनप्रयाग पासूनच मंदाकिनी नदी आमच्या सोबतच होती. मंदाकिनी नदीचा उगम 'चोराबारी ग्लेशीयर' मधून होतो. मला असं वाटतं होत की माझ्या बाबांनी मला मंदिरापर्यंत रस्ता दाखविण्यास, मार्गदर्शन करण्यास तिला खाली पाठविले आहे. दर्शनाला जाण्यासाठी भाविकांची गर्दी उसळली होती. वाट काढत-काढत आम्ही गौरीकुंडापर्यंत पोहोचलो.
गौरीकुंड  : - गौरीकुंड येथे माता पार्वतीने शिवप्राप्तीसाठी तपश्चर्या केली होती. हजारो वर्षाच्या तपश्चर्येने महादेव मातेस प्रसन्न झाले आणि त्यांचा विवाह 'त्रिगुणी नारायण' येथे संपन्न झाला. एवढ्या शितल वातावरणात गौरीकुंड येथे गरम पाण्याचे झरे आहेत. येथे स्नान करून भाविक मातेचे दर्शन घेतात. मातेची अनुमती घेऊनच पुढे केदारनाथसाठी प्रयाण केले जाते. माता पार्वतीचे एक नाव गौरी असल्याने ह्या स्थानाला गौरीकुंड असे नांव पडलेले आहे. 2013 च्या आपदेत हे कुंड वाहून गेले होते. आता काही गरम पाण्याच्या धारांचा शोध लावून छोटेसे कुंड तेथे बांधण्यात आले आहे. मातेची अनुमती घेऊन आम्ही पुढील चढाईस सुरवात केली. घोडे, पालखीवाले, पिट्टूवाले ह्यातून वाट काढत आम्ही चढत होतो. रस्त्यावर सर्वत्र रेलिंग लावले असल्याने चढाई करणे तुलनेने सोपे जात होते. 'हर हर महादेव, जय केदारबाबा!' असा जयजयकारा मन प्रसन्न करत होता. सर्वत्र हिरवळ पसरली होती. उंच-उंच झाडे, डोंगर जणू आकाशालाच गवसणी घालायला निघाले आहेत असा भास होत होता. वाटेत सर्वत्र खाण्या- पिण्याचे साहित्य मुबलक प्रमाणात मिळत होते. स्वच्छतागृहे, प्राथमिक उपचार केंद्र जागोजागी आढळून येत होते. गार तसेच गरम पाण्याचे काउंटरही भक्तांसाठी उपलब्ध होते. बघता बघता आम्ही 'चीरबासा' पर्यंत आलो. तेथे भैरवनाथाचे दर्शन घेतले. भैरव म्हणजेच 'भयाचा स्वामी.' भैरव हे शिवाचे शक्तिशाली व प्रचंड रूप आहे. भैरवनाथाला क्षेत्रपाल असेही म्हणतात. भैरवनाथाच्या मंदिरात त्यांची ऊर्जा, तेज प्रकर्षाने जाणवत होते. मध्येच वाटेत उंच उंच धबधबे दिसून येत होते. धबधब्याच्या नैसर्गिक, शुद्ध पाण्याचा आस्वाद आम्ही घेतला. हिमाच्छादित डोंगराच्या आडून प्रकट झालेल्या सूर्यनारायणाची लाल शेंदरी आभा सर्व सृष्टीला दैदीप्यमान करत होती. असे वाटत होते त्या हिमपर्वतावर जावे, त्याआड लपून बसलेल्या सूर्यनारायणाला स्पर्श करावा. पण काही गोष्टी वास्तवात करणे शक्य नसते. तसंही निसर्गातील काही जागा अस्पर्श असतात आणि त्यातच त्यांची पवित्रता सामावलेली असते. स्पर्श न करता अशा जागा फक्त अनुभवायच्याच असतात.
आम्ही पुढे चालत होतो. जंगलचट्टी आम्ही पार केली.  थोडं चालणं आणि विश्रामासाठी खूप वेळ थांबणं असा आमचा प्रवास चालला होता. मजल-दरमजल करत आम्ही भीमबली टप्प्यापर्यंत येऊन पोहचलो. येथे बलभीमाची मोठी उंच मूर्ती आहे. दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. पण मला अत्यंत अस्वस्थ वाटत होते. एक पाऊलही पुढे टाकणे अशक्य झाले होते. म्हणून आम्ही प्राथमिक उपचार केंद्रात गेलो. माझे बी. पी. वाढले होते, ऑक्सिजन लेव्हल कमी झाली होती. तेथील डॉक्टरांनी ऑक्सिजन लावला, योग्य ते उपचार केले. साधारणतः पाऊण तासाने आम्ही तेथून निघालो. पायी चालणे मला शक्यच होत नव्हते.त्यामुळे आपण घोड्याने जाऊ असे  ठरविले.
घोडेवाले आम्हाला माहिती देत होते. रामबाडाचा जुना रस्ता त्यांनी दाखविला. २०१३ च्या प्रलयाचे प्रसंग ते सांगत होते, अंगावर सरसरून काटा येत होता. आवाज बसल्याने माझे बोलणे बंदच होते त्यामुळे निसर्गाचा आस्वाद घेता येत होता. ऊन चांगलेच तापले होते. पूर्ण केदारघाटीने जणू सोळा शृंगार केला होता. रस्त्यात काही छोटी छोटी झूडूपे दिसत होती. त्यांना सुंदर-नाजूक लाल, गुलाबी, पांढरी फुले लगडलेली होती. घोडेवाल्याने सांगितले, “ती बुरांसची फुले आहेत. त्याचे सरबत केले जाते. हे सरबत आमचे पहाडी ग्लुकॉन-डी आहे. आपल्याला वाटेत मिळेल तुम्ही पिऊन पहा.” जेथे जेथे नजर जाईल तेथे डोंगर, दऱ्या व त्यावर असलेली हिरवळ मन प्रसन्न करीत होती. एखाद्या वळणावर हिमपर्वत दिसत होते, तेथेच माझे बाबा त्रिशूल घेऊन भक्तांकडे लक्ष ठेवत आहे असा मला भास होत होता. अर्थात ही माझी कल्पना होती की सत्य हे आजही न उलगडलेले कोडे आहे.
घोड्यांना रस्त्यात गरम व गार पाणी हौदामध्ये उपलब्ध होते. प्रशासन व्यवस्था उत्तम होती.  भैरव गधेडा येथे आम्हाला ग्लेशियर दिसले. दोन्ही बाजूनी बर्फ व त्या मधून जाण्यासाठी केलेला रस्ता, जणू आपल्यासाठी कोणी बर्फाच्या पायघड्या अंथरल्यात. हा अनुभव शब्दात व्यक्त करणं खूप अवघड आहे. ही गोष्ट फक्त अनुभवायचीच असते. मध्येच एक ठिकाणी आम्हाला जोरदार पहाडी पाऊस लागला. अखेर घोडा पडाव आला आणि आम्ही घोडेवाल्यांचे आभार मानून पुढे पायी निघालो. आता सुद्धा चालण्याची ताकद नव्हती. त्यापेक्षा आपण चालत येऊ शकलो नाही ही रुखरुख मनाला लागली होती. बाबा मला माफ करा मी पायी येऊ शकलो नाही, हा विचार सतत त्रास देत होता. माझ्या अगोदर जे घोड्यावरती आलेले होते ते सर्व एक ठिकाणी थांबून येणाऱ्यांची वाट बघत होते.त्याच वेळेस चालता चालता मंदिराचे शिखर डोळ्यासमोर आले आणि आम्ही स्तब्ध झालो. प्रथम दर्शन, त्यात काय नव्हते! समाधान, स्वप्नपूर्ती, कष्टाचे चीज तरीही माझे मन तळमळत होते. त्यावेळी मला माझ्या भोलेबाबांचा सहवास जाणवला मनात शब्द उमटू लागले,  माझ्या मनातली खंत नाहीशी झाली आणि पाऊले पुढे पडू लागली. साधारणतः एक ते दीड किलोमीटर अंतर चालून आल्यावर  मंदीर परिसरात गेलो. प्रत्यक्षात मंदिराच्या समोर उभे राहिलो. हात आपोआप जोडले गेले, डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या. ज्याच्यासाठी हा अट्टाहास केला तो परमेश्वर आपल्या अगदीच जवळ आहे ही जाणीवच काही और होती. घेतलेले कष्ट सार्थकी लागले होते. आता फक्त डोळेभरून दर्शन घ्यायचं होत. मंदिर परिसरात पोहोचल्यावर उद्या पहाटे दर्शन करू असे आम्ही ठरवले. . मन तर वायुवेगाने मंदिरात गेले होते पण शरीर आज काही साथ देत नव्हते, आणि मन वाट पाहायला तयार नव्हते. विचित्र द्वंद्वात जीव सापडला होता.
असो, तेथे आम्ही कॉमन हॉल घेऊन हॉलमध्ये आराम करायला गेलो. तापमान हळूहळू खाली घसरत होते. आम्ही ऊबदार कपडे घालून पांघरूण घेऊन पडलो होतो थोड्या वेळानंतर आम्ही सहजच म्हणून बाहेर फेरफटका मारण्यास गेलो.आणि पाहतात तर काय दर्शन रांगेत अत्यंत कमी गर्दी होती. आम्ही लगेच दर्शन रांगेत जाऊन उभे राहिलो. अवघ्या अर्ध्या तासात आम्ही मंदिराच्या प्रवेश दारात आलो. आनंद माझ्या पोटात मावत नव्हता. मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश केल्यावर एका दिव्य शक्तीची, ऊर्जेची जाणीव होऊ लागली. शरीर पिसासारखे हलके झाले होते. मंदिरातील गणपती, पार्वती माता, पांडव मूर्ती यांचे दर्शन घेतले. हळूहळू रांग पुढे सरकत होती आणि एका क्षणी मी बाबांच्या पिंडीसमोर उभी होतो. काळ तेथेच गोठला होता. माझे स्वप्न आज पूर्णत्वाला आले होते. मनाची तळमळ नाहीसी झाली. नेलेले वस्त्र, प्रसाद अर्पण करण्याचे भान उरले नव्हते. फक्त नी फक्त मिळणारा प्रत्येक क्षण मी अंतःकरणात साठवत होतो. आज मनाप्रमाणे मेंदू ने ही बंड पुकारले होते. माझ्या सर्व जाणीवाच तेथे लोप पावल्या होत्या. समाधी अवस्था ह्यालाच तर नसतील ना म्हणत! फक्त दर्शनसूख मी लुटत होतो. लोकं-पुजारी 'पुढे चला' असे म्हणत ओरडत होते. पुढच्या क्षणी मी मंदिराबाहेर ढकललो गेले. बाहेर येताच घंटेचा नाद व 'बं बं भोले' चा गजर सुरु झाला. एक साधू डमरू वाजवू लागला. भोलेबाबांची आरती सुरु झाली. वातावरण अत्यंत दिव्य होते. स्वर्ग ह्याच्यापेक्षा काय वेगळा असणार! खरंच स्वर्गीय अनुभूती मिळत होती. “बाकीचे दर्शन घ्यायला निघायचे, चल पटकन!” ह्या वाक्याने मला भौतिक जगात आणलं. आम्ही मंदिराच्या मागील प्रांगणात येऊन भीमशिळेचे दर्शन घेतले. २०१३ साली उत्तराखंडमध्ये आलेल्या विध्वंसक आपदेमध्ये पूर्ण केदारघाटी वाहून गेली, उत्तराखंड क्षतीग्रस्त झाले मात्र केदारनाथाच्या दगडी मंदिराला किंचितही धक्का लागला नाही. कारण पुराच्या पाण्यात एक भलीमोठी शिळा वाहत आली आणि मंदिराच्या पाठीमागे येऊन थांबली. त्यामुळे पाण्याचा प्रवाह विभागला गेला व मंदिर सुरक्षित राहिले. त्या शिळेला भीमशिळा म्हणून ओळखले जाते. त्यानंतर आम्ही जगद्गुरू शंकराचार्य यांचे दर्शन घेतले. जवळच असलेल्या ॐ मंदीरातील एक चमत्कार अनुभवला. या मंदिरात एका पाण्याचे कुंड आहे. तेथे ॐ नमः शिवाय म्हंटल्यावर पाण्यात तरंग निर्माण होतात. भव्य ॐ प्रतिकृतीचे दर्शन घेऊन आम्ही जेवण करून रूमवर आराम करण्यासाठी आलो . हवेत अत्यंत गारठा होता. मन म्हणत होते, “ना मिले बरखा बहार, मिले मुझे बाबा का प्यार!” खरंच आम्ही खूपच नशीबवान होतो म्हणून आम्हाला दर्शन सौभाग्य प्राप्त झाले. ह्या आनंदात कधी झोप लागली हे समजलेच नाही.
पहाटे लवकर उठून आम्ही दर्शनास जाऊ असे ठरविले पण आज दर्शन रांग मोठी होती. त्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतले. असे म्हणतात केदारनाथ शिवलिंग प्रतिमा नाही तर ते शिवशरीर आहे. शिवसान्निध्याचा लाभ घेता यावा म्हणून आम्ही मंदीर प्रांगणात बसलो. सर्वांच्या मनात फक्त आनंद-समाधान होते. मनाला स्थिरता प्राप्त झाली होती. बाबांनी तर आपल्याला हवं ते दिले, बाबांना आपण नक्की काय अर्पण करावे हा एक मोठा प्रश्नच असतो. बाबांना हवं आहे ते फक्त नामस्मरण! हिच खरी त्यांची सेवा.
खरं तर भोले बाबांचे दर्शन स्वप्नात झाले तरी जीवन धन्य झाले असे मानतात. येथे तर साक्षात आपण डोळ्यांनी त्यांना पाहू शकलो, त्यांचे अस्तित्व आपल्याला जाणवले. काही क्षण आपण माया-मोह, संसार ह्यापासून मुक्त झालो. बाबा तरी एक मागणे तूला मी मागतो. 'तुझा वास माझ्या मनात निरंतर असू दे, तुझ्या कारणी देह माझा पडू दे.' पाय निघता निघत नव्हते. डोळे सतत वाहत होते. बाबा मला परत बोलवा आणि हो, पुढच्या वेळेस दर्शनाला मला चालतच बोलवा. परत येण्यासाठी आम्हाला आज जाणे भागच होते. मनाला आवर घालत आम्ही अखेर मार्गस्थ झालो.
“ शिव भोळा चक्रवती,
 त्याचे पाय माझे चित्ती !
वाचे वचता शिवनाम,
तया न बादी क्रोधकाम !”
                      श्री भास्कर सोनवणे पत्रकार

Share

Other News

ताज्या बातम्या