चारधाम यात्रा भाग : 1 भावनांचा कल्लोळ! (उत्तराखंड चार धाम यात्रा)

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 18/07/2025 10:51 PM

चारधाम यात्रा भाग : 1
भावनांचा कल्लोळ! 
(उत्तराखंड चार धाम यात्रा)
2020 मध्ये कोविड मुळे लॉकडाऊन लावण्यात आले, ‘भूतो न भविष्यती’ अशी परिस्थिती निर्माण झाली.  सर्व कुटुंबीय 24 तास घरातच असल्याने नवनवीन खेळ, पाककृती, सिनेमे, व्हिडिओ कॉल्स यात वेळ जाऊ लागला. पण लवकरच या सर्व गोष्टींचा कंटाळा आला. लेकीने पुढील वर्षाच्या अभ्यासास सुरुवात केली, नवऱ्याने उकरून-उकरून ऑफिसचे कामे काढली. अशा वेळेस माझ्यापुढे यक्ष प्रश्न निर्माण झाला ‘मी करायचे काय?’ थोड्याच कालावधीत मलाही पर्याय मिळाला, मी युट्युब वर Travel Vlogs पाहायला सुरुवात केली. ‘देवभूमी उत्तराखंड’ मला आवडू लागले. ‘केदारनाथ दर्शन’ तर माझ्या मर्मबंधातली ठेव झाली होती. या काळात जीवन मरणाचे प्रश्न निर्माण झाले होते तरीही मनात एक बीज अंकुरलं होतं, आपण केदारनाथ ला जायचे. नवऱ्याने ही या बीजाला खतपाणी घालून त्याचं रोपटं केलं. बघता बघता आपण सर्वांनीच कोविड वर मात केली. हळूहळू जीवन पूर्वपदावर आले. मनातल्या रोपट्याचा आता वृक्ष बहरून आला होता. आता फक्त फळाचीच आस  होती. यावर्षी केदारनाथला जायचच अस आम्ही ठरवलं. 2022, 2023 साली नेहमीप्रमाणेच लेकीच्या परीक्षेने त्याला वाटाण्याच्या अक्षदा लावल्या. महादेवाने आपल्याला अजून बोलावलं नाही, या विचाराने मन विषन्न होत होते. “भोले बाबा किती दिवस अशी लेकीची परीक्षा बघताय?” मी वारंवार बाबांना विचारत होते, शिवस्तुती म्हणताना कंठ दाटून येत होता, कोणी केदारनाथला जाऊन आलंय हे समजलं की बाबा आपल्याला कधी बोलवणार? हा प्रश्न मनाला भेडसावत असे. मनातील भावना अश्रूरूपात व्यक्त होत होत्या.
यावर्षी अधिक मास असल्याने केदारनाथचे कपाटेच उशीरा उघडली. त्यामुळे उत्तराखंड चारधाम यात्रेला जाणं निश्चित करण्यात आलं. जायला 3 महिने अवधी होता, मग या कालावधीत माहिती घेण्यासाठी मी इंटरनेटला शरण गेले. प्रवासातले अंतर, तेथील नव्याने झालेले रस्ते, रस्त्यांचे रुंदीकरण, सुख-सुविधा पाहून मन हरखून जात होते. मध्येच 2013 चा प्रलय आठवून जीवाचा थरकाप उडत होता. उत्तराखंडातील लहरी हवामान मनात थैमान घालत होते. मे महिन्याच्या सुरुवातीस केदारनाथ जवळ टेहरी-गढवाल मधील जंगलाना भीषण वणवा लागण्यास सुरुवात झाली, कारण नैसर्गिक असल्याने पाऊस पडल्याशिवाय वणव्याला अटकाव लागणार नव्हता. माझ्या मनातील भीती डोके वर काढत होती. आपल्याला तर 30 मे ला निघायचं, कसं होणार? 
चारधाम चे कपाटे उघडल्यानंतर तेथील गर्दीने विक्रमी उच्चांक गाठला. 2023 मध्ये पूर्ण सीझनला जेव्हढे भक्त आले होते, तो आकडा पहिल्या 10 दिवसातच ओलांडला गेला होता. रस्ता जाम मुळे दिवस-दिवस भक्त वाहनातच अडकू लागले. भीषण गर्दीमुळे चेंगरा चेंगरी, प्राथमिक सोयी-सुविधांचा अभाव, भक्तांची होणारी गैरसोय आणि सर्व सहन करूनही दर्शन न घेता भाविकांना परत यावे लागत होते. मागील वर्षापेक्षा तब्बल 120 ते 150 टक्क्यांनी गर्दीत  वाढ झाली होती. त्यामुळे संपूर्ण प्रशासन व्यवस्था कोलमडून गेली होती. सर्व न्यूज चॅनेल तेथील परिस्थिती दाखवत होते. भक्तांनी यात्रेला सध्या येऊ नये हे सुचवीत होते. मनात द्वंद्व निर्माण झाले होते. भावनांचा एकच कल्लोळ माजला होता. काय करावे, to be or not to be, मोठा प्रश्न होता.
पण एक मन म्हणत होते आपल्याला महादेवानेच बोलावले आहे मग ह्याची चिंता आपण का वाहतो आहे. देवांचा देव आपल्या सहाय्यासाठी, संरक्षणासाठी असताना हा विचार येणेच चुकीचे आहे. जे होईल ती त्याची मर्जी, चारधाम यात्रेला जायचे हे आम्ही निश्चित केले. 
काही दिवसातच परिस्थिती अमुलाग्र बदलली, रजिस्ट्रेशन बंद केल्याने गर्दी लक्षणीय कमी झाली. सर्व भक्तांना आता दर्शन मिळू लागले होते. या बातम्या पाहून अत्यंत हायसे वाटले. खरंतर महादेवानेच आपल्याला बोलावले म्हणजे निर्विघ्न जाणे होणारच, हाच विश्वास खरा! अडचणी, चिंता दूर करायला माझे भोले बाबा आहेतच. हे मला उशिरा सुचलेलं शहाणपणच म्हणा ना!
दि.30 मे ते 15 जून अशी आमची यात्रा श्री. प्रवीण वाईकर, भगूर यांच्या नियोजनाखाली उत्कृष्टपणे पार पडली. हरिद्वार, यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ, ऋषिकेश या ठिकाणी अत्यंत सुंदर दर्शन लाभ घेता आला. त्याचे अनुभव क्रमशः मी सादर करणार आहे. कृपया त्याचा आस्वाद घ्यावा.
माझ्याकडून ही लेखमाला माझ्या भोलेबाबांनी करवून घ्यावी ही त्यांच्या चरणी प्रार्थना.
एका गाण्याच्या ओळी नेहमीच मला भुरळ घालतात.
 “बाबा तू मेरा भगवान, तेरे ही चरणो मे रहना जब तक मेरे तन मे प्राण,
मेरे बाबा, मेरे बाबा भोलेबाबा!”
              -सौ. प्रांजली नवीन कुलकर्णी
कृपया लेख शेअर करते वेळी तो नावा साहितच करण्यात यावा.

Share

Other News

ताज्या बातम्या