नांदेड :- सलग चार दिवस सुट्टी येत असल्यामुळे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचे मुख्य परिसर, उपपरिसर लातूर व परभणी, तसेच न्यू मॉडेल डिग्री कॉलेज, हिंगोली आणि कै. उत्तम राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्र, किनवट हे सर्व परिसर दि.१८ ते २१ डिसेंबर, २०२५ दरम्यान बंद राहणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे.
दि.१८ डिसेंबर रोजी श्रीक्षेत्र खंडोबा माळेगाव यात्रेनिमित्त नांदेड जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यानंतर दि.१९ डिसेंबर रोजी विद्यापीठाचे कुलगुरू यांनी बदली सुट्टी जाहीर केली आहे. तसेच दि.२० डिसेंबर रोजी तिसरा शनिवार व दि.२१ डिसेंबर रोजी रविवार असल्यामुळे विद्यापीठ सलग चार दिवस बंद राहणार आहे.
या कालावधीत विद्यापीठातील सर्व शैक्षणिक व प्रशासकीय कामकाज पूर्णतः बंद राहणार असून सर्व संबंधित विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी तसेच अभ्यागतांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार यांनी परिपत्रकाद्वारे केले आहे.