नांदेड :- दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र माळेगाव (ता. लोहा) येथे श्री खंडोबाची भव्य यात्रा येत्या १८ डिसेंबरपासून सुरू होत असून १८ ते २५ डिसेंबर २०२५ या कालावधीत नांदेड जिल्हा परिषदेमार्फत भव्य कृषी प्रदर्शन, विविध सांस्कृतिक, कृषी व पशुसंवर्धन विषयक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
नांदेड जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी.बी. गिरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजकुमार पडिले, सहआयुक्त डॉ. प्रवीणकुमार घुले, कृषी विकास अधिकारी डॉ. नीलकुमार ऐतवडे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल रावसाहेब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मयूर अंदेलवाड, नरेगा उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रसाद चेन्ना, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर, नियोजन विभागाचे शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे आदींची उपस्थिती होती.
चौकट
माळेगाव यात्रेतील विविध कार्यक्रम याप्रमाणे- १८ डिसेंबर रोजी श्री खंडोबाची पालखी पूजन व कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन, १९ डिसेंबर रोजी पशु, अश्व, श्वान, कुक्कुट प्रदर्शन व दुग्ध स्पर्धांचे उद्घाटन तसेच महिला व बालकांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. २० डिसेंबर रोजी कृषीनिष्ठ शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. २२ डिसेंबर रोजी महिला आरोग्य शिबिर तसेच लावणी महोत्सव, २३ डिसेंबर रोजी पशुप्रदर्शन व दुग्ध स्पर्धांचे बक्षीस वितरण तसेच कुस्त्यांची प्रचंड दंगल, २४ डिसेंबर रोजी पारंपरिक लोककला महोत्सव, तर २५ डिसेंबर रोजी शंकरपटाचे (बैलजोडी-बैलगाडा शर्यत) आयोजन करण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी दिली.
यात्रेदरम्यान भाविकांच्या सोयीसाठी जिल्हा परिषदेमार्फत फिरती शौचालये, आरोग्य सेवा, मुबलक शुध्द पाणीपुरवठा, विजपुरवठा, सीसीटिव्ही कॅमेरे, पशुसंवर्धनासाठी दवाखाने, ॲम्बुलन्स आदी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. प्रारंभी माळेगाव यात्रा नियोजन पोस्टरचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. त्यानंतर पशुसंवर्धन विभागाची चित्रफीत दाखविण्यात आली. यावर्षी कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या विविध स्पर्धांमधील बक्षिसांच्या रकमेत लक्षणीय वाढ करण्यात आल्याची माहितीही यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी दिली.
चौकट
माळेगाव यात्रेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, जिल्हा परिषदेमार्फत उभारण्यात आलेल्या कृषी व पशुसंवर्धन प्रदर्शनास भेट देऊन यात्रेचा आनंद घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी केले.