नांदेड : शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेडचे उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी सन 2025 या वर्षभराच्या कालावधीत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या एकूण 23 गुन्हेगारांना तडीपार करण्याची प्रभावी कारवाई केली आहे.
तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांवर शस्त्र अधिनियम, पोक्सो आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद असून त्यांचा वयोगट 23 ते 35 वर्षे इतका आहे. पोलीस ठाण्यानिहाय तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. नांदेड ग्रामीण 13, इतवारा 6, विमानतळ 2, वजिराबाद 1, शिवाजीनगर 1 अशी एकूण 23 गुन्हेगारांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईसाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक तसेच विद्यमान उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. वेंजनें व श्री. शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
*नागरिकांना आवाहन*
जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. शांतता, सुरक्षितता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्ती, संशयास्पद हालचाली किंवा कायदा मोडणाऱ्या बाबी निदर्शनास आल्यास तात्काळ संबंधित पोलीस ठाणे अथवा प्रशासनास माहिती द्यावी. सुरक्षित नांदेड घडवण्यासाठी सर्वांनी जबाबदार नागरिक म्हणून पुढाकार घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी केले आहे.