मराठवाडा संतांची, वीरांची भूमी आहे. याच भूमीतील नांदेड जिल्ह्यात माळेगाव आहे. लोहा तालुक्यातील या गावात मोठी यात्रा भरते. ही यात्रा मार्गशीर्ष अमावास्येला सुरू होते. दक्षिण भारतात ही यात्रा अत्यंत प्रसिद्ध आहे. माळेगाव केवळ धार्मिक स्थळ नाही. ते ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देणारे मोठे व्यापारी केंद्र आहे. या यात्रेला आजपासून (ता. 18 ते 25 डिसेंबर) सुरुवात होत आहे. त्यानिमित्ताने या यात्रेवर प्रकाश टाकणारा हा लेख.
माळेगाव यात्रेला जवळपास चार शतकांची परंपरा आहे. मोगल, निजाम काळापासून या यात्रेला अनन्य साधारण महत्त्व होते. ऐतिहासिक काळापासून माळेगाव घोड्यांच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. आजही तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील व्यापारी येथे येतात. या ठिकाणी महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडोबाचे देखणे, सुंदर असे मंदिर आहे.
माळेगाव यात्रा म्हणजे लोककलांचे माहेरघरच. येथे कलगी-तुरा, वाघ्या-मुरळी, गोंधळ आणि भारूड सादर होतात. तमाशा, लावणी येथील मुख्य आकर्षण असते. नामांकित तमाशा फडांची जुगलबंदी येथे रंगते. तमाशासोबतच 'मौत का कुआँ' सारखे प्रकारही येथे दिसतात.
इतर यात्रांमध्ये प्रामुख्याने फक्त देवदर्शन असते. पण माळेगाव यात्रा वेगळी आहे. येथे कृषी प्रदर्शन आणि कुस्त्यांची दंगल पाहायला मिळते. पशु प्रदर्शन या यात्रेचे हृदय आहे. येथे हजारो जनावरांची खरेदी-विक्री होते. राजस्थानच्या पुष्कर मेळ्यानंतर घोड्यांच्या व्यापारासाठी ही दुसरी मोठी बाजारपेठ आहे. यात्रेत सर्वधर्मीय लोक आनंदाने सहभागी होतात. ही यात्रा म्हणजे उत्तम, असे सामाजिक सलोख्याचे प्रतीकच आहे.
माळेगाव यात्रा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. पाच ते सात दिवसांतच येथे कोट्यवधींची उलाढाल होते. चेतक, मारवाडी, पंजाबी अशा उच्च जातीचे घोडे विक्रीला येतात. या घोड्यांची खरेदी-विक्री किंमत चकित करणारी असते. यासह येथे गाढवांचीही मोठी बाजारपेठ भरते. वीटभट्टी व्यावसायिक आणि परराज्यातील व्यापारी येथे गाढवे खरेदी करतात. याशिवाय उंट, बैल, गायी आणि शेळ्या-मेंढ्यांचीही विक्री होते. कृषी अवजारे आणि खाद्यपदार्थांचीही मोठी उलाढाल होते.
अडचणीच्या काळात ही यात्रा शेतकऱ्याला आधार देते. पशुधन विकून आलेला पैसा शेतीसाठी वापरला जातो. यात्रेत शेतकऱ्यांना नवीन बियाणे आणि तंत्रज्ञानाची माहिती मिळते. तसेच यात्रेतून स्थानिक मजुरांना रोजगार मिळतो. पूर्वी यात्रेत कृषी विषयक वस्तूंची देवाण-घेवाण (Barter System) होत असे. आता रोखीने आणि 'युपीआय'द्वारे (Online) व्यवहार होतात. पूर्वी बैलगाडीतून येणारे भाविक चारचाकी गाड्यांमधून येतात.
माळेगावची ही यात्रा केवळ उत्सव नाही. ती ग्रामीण संस्कृतीची एक प्रयोगशाळा आहे. आधुनिकीकरणाच्या काळातही यात्रेने आपली ओळख जपली आहे. हजारो हातांना काम देणारी ही यात्रा खऱ्या अर्थाने 'वैभवशाली' अशीच आहे.
- डॉ. श्याम टरके,
सहायक संचालक (माहिती),
विभागीय माहिती कार्यालय, लातूर