आरटी आय न्यूज नेटवर्क
(विजय जगदाळे)
दहिवडी दि:माण तालुक्यातील मलवडी आणि भांडवली गावांच्या हद्दीतील बामनदाराक्षेत्रात पाणी फाउंडेशन तसेच विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून भांडवली ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड केली होती. वड, पिंपळ, आंबा, चिंच, करंज, शिसम, बांबू, चंदन, उंबर आदी विविध प्रकारच्या झाडांची लागवड करून या परिसरात हिरवळ निर्माण करण्याचा प्रयत्न ग्रामस्थांनी केला होता. विशेष म्हणजे हे संपूर्ण सुमारे ६८ एकर क्षेत्र मलवडी येथील श्री मल्हारी माळसाकांत देवस्थान ट्रस्टच्या मालकीचे आहे.
मात्र गेल्या वर्षी ऐन उन्हाळ्यात या भागात अज्ञात समाजकंटकांनी लावलेल्या आगीत मोठ्या प्रमाणावर वृक्षसंपदा जळून खाक झाल्याचे चित्र अनेकांनी पाहिले. त्यातून सावरत पुन्हा संगोपनाचा प्रयत्न सुरू असतानाच आता या बामनदाराक्षेत्राचा जनावरे चारण्यासाठी ८१ हजार रुपयांना लिलाव करण्यात आल्याने नवी समस्या उभी राहिली आहे. लिलावानंतर या ठिकाणी जनावरे चरण्यास येऊ लागल्याने अनेक झाडांवर कुऱ्हाड चालवली जात असल्याचे भयानक वास्तव समोर आले आहे. विशेषतः चंदन, उंबर यांसारख्या मौल्यवान झाडांची तोड होत असल्याचा आरोप भांडवली ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
भांडवली ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, जनावरे चारणारे लोकच या झाडांची मोठ्या प्रमाणावर हानी करत असून याबाबत त्यांनी संबंधित अधिकारी व प्रशासकीय विभागांकडे वारंवार तक्रारी करूनही कोणीही दखल घेतलेली नाही. “न्यायालय, अधिकारी, प्रशासन हे आमचेच असून आमचे कुणीही काहीही करू शकत नाही,” अशा प्रकारची भाषा मलवडीतील लिलाव करणारे लोक वापरत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे या प्रकरणात न्याय मिळेपर्यंत आपला लढा नेटाने सुरू ठेवणार असल्याचा निर्धार भांडवलीकर ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, महाराष्ट्र शासन वनसंवर्धनासाठी विविध योजना राबवत असताना या घटनेने गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत प्रत्येक गावाने किमान तीन हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यानुसार गुणांचे वितरण करून गावांचा निकाल ठरवला जाणार आहे. अशा महत्त्वाकांक्षी योजनेच्या पार्श्वभूमीवर जर लावलेली झाडेच सुरक्षित राहणार नसतील, तर वृक्षलागवड आणि संगोपन कसे साध्य होणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
एकीकडे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या योजना आणि दुसरीकडे प्रत्यक्षात वृक्षांची होत असलेली तोड, या विरोधाभासामुळे बामनदाराक्षेत्रातील हा वाद अधिकच चिघळत चालला असून प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
: मलवडी भांडवली मध्यभागी असलेले बामनदारा या शिवारातील हजारो झाडांची झालेली वृक्षतोड