सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यकर्ता मेळावा आणि पक्ष प्रवेश सोहळ्यास उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे उपस्थित राहून पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांना संबोधित केलं. या मेळावा निमित्तानं माजी महापौर श्री. मैनुद्दीन बागवान, माजी महापौर श्री. आनंदा देवमाने यांच्यासह माजी नगरसेवक व असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. सर्वांचं मनापासून स्वागत केलं, पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारधारेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल सुरू आहे. सर्वसमावेशक विकास हा आमचा संकल्प आहे. नवीन नेतृत्वाला संधी देणं, कार्यकर्त्यांना पुढे आणणं आणि सामान्य माणसाचा आवाज शासनापर्यंत पोहोचवणं, हेच आमचं ध्येय राहिलं आहे, असं यावेळी अजितदादांनी स्पष्ट केलं.
शेतकरी, कष्टकरी, युवक, महिला आणि सर्व समाजघटकांच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत. शेती, शिक्षण, कला, कौशल्य विकास, तीर्थक्षेत्र विकास आणि आधुनिक तंत्रज्ञान (AI) यांचा प्रभावी वापर करून महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधायचा आहे. ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण देण्याकरिता आम्ही नवनवीन उपाययोजना राबवण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
आपल्या कामाच्या माध्यमातून जनतेचा विश्वास जिंकणं, अशी आमची भूमिका कायम राहिली आहे. जनतेला विश्वासात घेऊन, कायदा-सुव्यवस्था राखून लोकसेवेच्या कार्याला पुढे नेण्यासाठी आम्ही तत्पर असल्याचं सभेत स्पष्ट केलं. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी समन्वयानं कामं करणं आवश्यक आहे. स्थानिक पातळीवरील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याकडे सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. याबाबतीत नवीन सहकाऱ्यांचा अनुभव आणि कार्यशैली उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.