‘
अहिल्यानगर, दि. २२ : उद्योगांना प्रोत्साहन देऊन आर्थिक विकासाला गती देण्यासाठी आयोजित ‘महा निर्यात इग्नाइट कन्व्हेन्शन २०२६’च्या माध्यमातून उद्योजकता व निर्यातवाढीस निश्चित चालना मिळेल, असा विश्वास निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांनी व्यक्त केला.
शहरातील हॉटेल यश ग्रँड येथे ‘महा निर्यात इग्नाइट कन्व्हेन्शन २०२६’चे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी श्री. गिते बोलत होते.
कार्यक्रमास उद्योग विभागाच्या सहसंचालक वृषाली सोने, प्रादेशिक संचालक डॉ. विवेक बक्षी, महाव्यवस्थापक दीपक शिवदास, जयद्रत खताळ, अरविंद पारगावकर, हरजितसिंग वाधवा, अरुण खामेरे, उद्योग अधिकारी अशोक बेनके, श्याम बिराजदार आदी उपस्थित होते.
श्री.गिते म्हणाले, आजच्या जागतिकीकरणाच्या व सतत बदलत्या आर्थिक परिस्थितीत उद्योजकता व निर्यातक्षम उत्पादन ही जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाची महत्त्वाची गुरुकिल्ली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध उद्योगविषयक, स्टार्टअप तसेच निर्यात प्रोत्साहन योजनांचा प्रभावी लाभ घेतल्यास जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मितीबरोबरच निर्यातवाढीसही चालना देता येईल. जिल्ह्यातील कृषीपूरक उद्योग, दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया, अन्नप्रक्रिया व मूल्यवर्धित उत्पादनांमधून देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यातीच्या मोठ्या संधी उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रशासनाच्या वतीने उद्योग उभारणीसाठी आवश्यक परवानग्या, सुलभीकरण, मार्गदर्शन व विविध यंत्रणांमधील समन्वयासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येत असून, उद्योजकांनी नावीन्यपूर्ण कल्पना, आधुनिक तंत्रज्ञान, दर्जेदार उत्पादन आणि जागतिक मानकांचा अवलंब करून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
औद्योगिक धोरण व सद्यस्थितीबाबत मार्गदर्शन करताना वृषाली सोने म्हणाल्या की, उद्योजकांना निर्यातीसाठी आवश्यक बाबी तसेच निर्यातवाढीच्या संधींबाबत सखोल माहिती मिळावी, या उद्देशाने ‘महा निर्यात इग्नाइट कन्व्हेन्शन’ या कार्यक्रमाचे आयोजन राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात करण्यात आले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात उद्योजकतेची सक्षम फळी असून उत्तम कनेक्टिव्हिटी उपलब्ध असल्याने निर्यातवाढीस मोठा वाव आहे. ‘एक जिल्हा एक उत्पादन’ या उपक्रमांतर्गत जिल्ह्यासाठी साखर व दुग्धजन्य उत्पादने निश्चित करण्यात आली असून, सध्या जिल्ह्यातून सुमारे १ हजार ४७९ कोटी रुपयांची उत्पादने निर्यात केली जात आहेत. निर्यातीसाठी केवळ स्थानिक बाजारपेठेवर अवलंबून न राहता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.
जागतिक बाजारपेठेत टिकून राहण्यासाठी पॅकेजिंग, ब्रँडिंग, गुणवत्ता व आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन यावर विशेष भर देणे गरजेचे आहे. मैत्री पोर्टलच्या माध्यमातून उद्योजकांना आवश्यक परवानग्या अत्यंत कमी कालावधीत उपलब्ध करून देण्यात येत असून, शासनामार्फत निर्यातवाढीसाठी विविध सवलती, सुविधा व प्रशिक्षण कार्यक्रमही राबविण्यात येत आहेत. उद्योजकांनी या संधींचा लाभ घेत निर्यातवृद्धीसाठी अधिक प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
प्रादेशिक संचालक डॉ. विवेक बक्षी म्हणाले, सेवा क्षेत्रातील निर्यात ही जिल्ह्याच्या आर्थिक प्रगतीसाठी मोठी संधी ठरू शकते. माहिती तंत्रज्ञान, आयटी-आयटीईएस, हेल्थकेअर, शिक्षण, पर्यटन, लॉजिस्टिक्स, डिझाइन, कन्सल्टन्सी आदी सेवा क्षेत्रांमध्ये जिल्ह्यातील उद्योजकांकडे आवश्यक कौशल्य व क्षमता उपलब्ध असून सेवा निर्यात प्रोत्साहन परिषदेच्या माध्यमातून या सेवांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडता येते. एसईपीसीमार्फत सेवा निर्यातदारांना नोंदणी, मार्गदर्शन, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ माहिती, व्यापार शिष्टमंडळे, तसेच विविध शासकीय निर्यात प्रोत्साहन योजनांचा लाभ मिळतो. डिजिटल माध्यमांमुळे जागतिक स्तरावर सेवा देणे सुलभ झाले असून उद्योजकांनी गुणवत्ता, वेळेचे पालन, आंतरराष्ट्रीय मानके आणि डेटा सुरक्षेवर भर देत एसईपीसीशी संलग्न होऊन सेवा निर्यात वाढीसाठी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महाव्यवस्थापक दीपक शिवदास यांनी महा निर्यात इग्नाइट कन्व्हेन्शन २०२६ आयोजनामागची भूमिका विशद केली.
दुपारच्या सत्रामध्ये ‘मैत्री व ईज ऑफ डुइंग बिझनेस’ या विषयावर मैत्री पोर्टलच्या प्रियदर्शनी सोनार आणि ईवाय सल्लागार युगा देवधर यांनी सादरीकरण केले. निर्यात प्रोत्साहनात डीजीएफटीची भूमिका या विषयावर विदेश व्यापार महासंचालनालयाचे अरुण खामेरे यांनी मार्गदर्शन केले. फ्लॅटेड गाळा भाडे अनुदान योजनेवर आयआयडीएच्या व्यवस्थापक प्रियांका मेहता यांनी प्रकाश टाकला.
इंडिया पोस्टचे दीपक नागपुरे यांनी डाक निर्यात केंद्र व न्यू इंडिया अशुरन्सचे प्रतीक देशमुख यांनी इन्शुरन्स कसे व कुठल्या प्रकारचे असावे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. एसआयडीबीआयचे सहाय्यक व्यवस्थापक महेंद्र भाले यांनी एसआयडीबीआयद्वारे राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती दिली. निर्यात सल्लागार सूरज जाधव यांनी शासनाच्या निर्यात धोरणाविषयी माहिती दिली. यावेळी संगमनेर येथील रणजीत वर्पे यांनी निर्यातीबाबत अनुभवाचे कथन केले.
जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक श्याम बिराजदार यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या कन्व्हेन्शनला जिल्ह्यातील उद्योजक, निर्यातदार, नवउद्योजक, स्टार्टअप प्रतिनिधी, विविध वित्तीय संस्थांचे प्रतिनिधी तसेच शासकीय विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#EconomicGrowth #EmploymentGeneration #IndustrialExhibition #BusinessNetworking #KnowledgeSharing #NewIndia #SustainableGrowth #InvestmentOpportunities #MaharashtraUdyog #GlobalStandards