नांदेड :- दि. २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी “हिंद-की-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे भव्य राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभाग व “हिंद-की-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी ३५० वी शहीदी समागम राज्यस्तरीय समिती यांच्या मार्गदर्शनाखाली शीख सिकलीकर, बंजारा-लबाना, मोहियाल, सिंधी तसेच इतर सर्व समाजांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे.
या कार्यक्रमासाठी नांदेड जिल्ह्यासह राज्यातील १२ जिल्हे तसेच देशातील विविध राज्यांतून सुमारे ८ ते १० लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कार्यक्रमाच्या कालावधीत शहर व शहरालगतच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असून, कोणत्याही अनुचित घटना घडू नयेत तसेच आपत्कालीन परिस्थितीचा शालेय विद्यार्थ्यांवर परिणाम होऊ नये, या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना आवश्यक ठरल्या आहेत.
त्या पार्श्वभूमीवर नांदेड तालुका हद्दीतील सर्व अंगणवाडी, शासकीय व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, महानगरपालिका शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, महाविद्यालये, खाजगी शिकवणी तसेच आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्रांतर्गत असलेल्या सर्व शैक्षणिक संस्थांना २४ जानेवारी २०२६ (शनिवार) रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
तथापि, ज्या ठिकाणी परीक्षा सुरू आहेत त्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार नियमितपणे सुरू राहतील. तसेच दि. २४ जानेवारी २०२६ रोजी जाहीर करण्यात आलेली सुट्टी पुढील शालेय व महाविद्यालयीन कामकाजात अर्धा दिवस वाढवून भरून काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
हे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल कर्डिले यांनी निर्गमित केला आहे.