नांदेड : अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने (AIOCD) देशभरात तसेच राज्यात बेकायदेशीररीत्या इंटरनेट फार्मसीद्वारे होणारी ऑनलाईन औषध विक्री, ई-पोर्टल तसेच GSR 817(E) दि. 28 ऑगस्ट 2018 आणि कोविड संदर्भातील GSR 220(E) दि. 26 मार्च 2020 हे आदेश मागे घेण्याच्या मागणीसाठी 20 मे रोजी एक दिवसीय देशव्यापी बंद पुकारला आहे.
या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी नांदेड शहरासह तालुका व ग्रामीण भागातील केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनला आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोणत्याही रुग्णाला औषधांच्या उपलब्धतेबाबत अडचण निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक व्यवस्था ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
तसेच जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय नांदेड, नांदेड-वाघाळा महानगरपालिका आरोग्य विभाग तसेच डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनालाही त्यांच्या औषध भांडारात पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवण्याबाबत कळविण्यात आले आहे.
बंदच्या कालावधीत गरजू रुग्णांना औषधे उपलब्ध न झाल्यास अथवा अत्यावश्यक औषधांची गरज भासल्यास त्यांनी अन्न व औषध प्रशासन कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त (औषधे) अ. तु. राठोड यांच्याशी भ्रमणध्वनी क्रमांक 8369027068 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच नागरिकांनी आवश्यक औषधे आगाऊ खरेदी करून ठेवावीत, जेणेकरून संभाव्य गैरसोय टाळता येईल, असेही अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त अ.तु. राठोड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.