नांदेड : नांदेड शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या शिवाजी नगर भागात महानगरपालिकेतर्फे अनधिकृत जाहिरात होर्डींग्सवर धडक कार्यवाही करुन बजाज नगर येथे खाजगी बिल्डर धवन रेसीडन्सीचे बॅनर लावणारे अनिल दिलीप यादव, गणेश कटकम कंत्राटदार व विशाल माठी यांच्यासह बॅनर तयार करणारे व लावणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने मनपा हद्दीमध्ये जाहिरात फलक लावण्यासाठी एकुण ११८ ठिकाणे निश्चित केले असुन सदरील ठिकाणी जाहीरात फलकांच्या फ्रेम लावण्यात आलेल्या असुन त्या फ्रेमची साईज सुध्दा निश्चित करण्यात आलेली आहे. ज्यामध्ये महानगरपालिकेने निर्धारीत केलेले शुल्क भरुन नागरीकांना / स्वंयसेवी संस्थांना तात्पुरती जाहिरात लावता येते. परंतु शहरातील खाजगी बिल्डर यांच्यासह बॅनर तयार करणारे व लावणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुध्द विनापरवानगी जाहिरात फलक लावण्यात आल्याचे मंगळवार दिनांक १९.०५.२०२६ रोजी निदर्शनास आल्याने महाराष्ट्र विरुपन प्रतिबंधक कायदा १९९५ चे कलम ३ चे उल्लंघन केल्यामुळे संबंधीत बिल्डर व इतर व्यक्ती विरुध्द भाग्यनगर पोलीस स्टेशन येथे महानगरपालिके तर्फे FIR No. ०२७०/२०२६ दिनांक १९.०५.२०२६ रोजी नोंदविण्यात आली आहे. तसेच कौठा भागात मुख्य रस्त्यालगत अनधिकृत बॅनर लावल्याप्रकारणी सिडको ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल प्रकरण्याची प्रक्रिया सुरु आहे.
सदरील कारवाई *मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या आदेशाने अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम व उपआयुक्त स.अजितपालसिंघ संधु* यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी नगर क्षेत्रिय कार्यालयाचे क्षेत्रिय अधिकारी रमेश चवरे, इमारत निरीक्षक भरत शिवपुरे, अतिक्रमण पथक प्रमुख विशाल सोनकांबळे, दत्ता कल्याणकर व त्यांच्या अतिक्रमण पथकाने पार पाडली आहे. शहरातील नागरीकांनी व व्यापारी वर्गाने महापालिकेने निश्चित केलेल्या अधिकृत स्थळावर परवानगी घेऊन होर्डींग्स लावावेत त्याचप्रमाणे अनधिकृत जाहिरात फलक लावुन शहर विद्रुपीकरण न करता महानगरपालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.