आरटी आय न्यूज नेटवर्क
(विजय जगदाळे)
सातारा, दि. : महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयुक्त मा. सुधाकर तेलंग यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली.
बैठकीस जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उपजिल्हाधिकारी महसूल विक्रांत चव्हाण यांच्यासह सर्व विभागांचे जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि मुख्याधिकारी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते.
यावेळी मार्गदर्शन करताना मा. सुधाकर तेलंग यांनी सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात 'आपले सरकार सेवा केंद्रांची' संख्या वाढविण्याची आवश्यकता अधोरेखित केली. जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये पुढील तीन महिन्यांच्या आत आपले सरकार सेवा केंद्र सुरू करावीत, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
तसेच जिल्ह्यात 'आदर्श सेतू केंद्र' आणि 'आदर्श सेवा केंद्र उभारण्याबाबतही त्यांनी सूचना केल्या. नागरिकांना पारदर्शक, सुलभ आणि विहित कालावधीत सेवा मिळणे ही शासनाची प्राथमिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
मा. तेलंग यांनी सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सेवा हक्क
कायद्याची माहिती देणारे डिजिटल माहिती फलक लावणे, सेतू केंद्र चालकांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे तसेच नगरपालिका क्षेत्रात लोकसंख्येनुसार सेवा केंद्रांची संख्या वाढविण्याबाबतही निर्देश दिले.
"अपील प्रकरणांचा जलद निपटारा करा" असे आवाहन करताना त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्यानुसार प्रथम व द्वितीय अपील प्रक्रियेचा प्रभावी वापर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनीही उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. नागरिकांच्या सोयीसाठी सातारा जिल्ह्यात लवकरच 'आदर्श सेतू केंद्र' उभारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.