नांदेड : नांदेड जिल्ह्यासह राज्यातील शालेय क्रीडा स्पर्धा तातडीने सुरू कराव्यात, क्रीडा स्पर्धांचे पोर्टल लवकरात लवकर अपडेट करून मागील वर्षांचा क्रीडा डाटा सुरक्षित ठेवावा तसेच स्पर्धांच्या प्रवेश शुल्कावर योग्य मर्यादा निश्चित करून खेळाडू, पालक, शाळा आणि क्रीडा शिक्षकांवरील आर्थिक भार कमी करावा, यासाठी नांदेड जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जी. बी. मदने, जे.ई.गुपिले यांनी आमदार कु. श्रीजयाताई अशोकराव चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
सध्या शालेय क्रीडा स्पर्धांचे पोर्टल अपडेट होणे, खेळाडूंची ऑनलाइन नोंदणी, स्पर्धांचे वेळापत्रक व प्रत्यक्ष स्पर्धा सुरू होण्याबाबत जिल्ह्यातील खेळाडू आणि क्रीडा शिक्षकांमध्ये प्रतीक्षेचे वातावरण आहे. त्यामुळे पोर्टलची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून मागील वर्षांचा संपूर्ण क्रीडा डाटा सुरक्षित ठेवावा आणि तालुका, जिल्हा, विभागीय व राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा लवकरात लवकर सुरू कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या प्रवेश शुल्कामुळे अनेक शाळा, विद्यार्थी, पालक आणि क्रीडा शिक्षकांवर आर्थिक भार पडत आहे. विशेषतः ग्रामीण व मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना त्याचा मोठा फटका बसतो. त्यामुळे प्रवेश शुल्कावर शासनाने कमाल मर्यादा निश्चित करावी आणि कोणत्याही अतिरिक्त खर्चाचा भार विद्यार्थी, पालक, शाळा किंवा क्रीडा शिक्षकांवर पडू नये, अशी प्रमुख मागणी करण्यात आली.
सर्व सहभाग व गुणवत्ता प्रमाणपत्रे जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत उपलब्ध करून द्यावीत, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे. प्रमाणपत्रे डाउनलोड करून प्रिंट काढण्यासाठी क्रीडा शिक्षकांना स्वतःच्या खिशातून खर्च करावा लागू नये, यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली.
याशिवाय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये डिजिटल नोंदणी, पारदर्शक निवड प्रक्रिया, वेळेत स्पर्धा वेळापत्रक जाहीर करणे, ग्रामीण व मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना समान संधी, सुरक्षित व सुविधायुक्त स्पर्धा केंद्रे तसेच क्रीडा शिक्षकांना आवश्यक प्रशासकीय सहकार्य उपलब्ध करून देण्याच्या मागण्याही करण्यात आल्या.
जी. बी. मदने म्हणाले, “शालेय क्रीडा स्पर्धा या विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांना वाव देण्यासाठी आहेत. आर्थिक अडचणीमुळे एकही गुणवंत खेळाडू स्पर्धेपासून वंचित राहू नये. जिल्ह्यातील खेळाडू व क्रीडा शिक्षक स्पर्धा सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यामुळे आमदार कु. श्रीजयाताई अशोकराव चव्हाण यांनी या विषयात लक्ष घालून पोर्टल अपडेट, जुना क्रीडा डाटा सुरक्षित ठेवणे आणि स्पर्धा तातडीने सुरू करण्यासाठी शासन दरबारी प्रभावी पाठपुरावा करावा.”
यावेळी आमदार कु. श्रीजयाताई अशोकराव चव्हाण यांनी निवेदनातील सर्व मागण्यांची दखल घेत, संबंधित मागण्या शासन दरबारी मांडून त्यासाठी प्रभावी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.