नांदेड:-नांदेड रेल्वे मंडळाच्या वैद्यकीय विभागाच्या नियोजनानुसार, मुख्य वैद्यकीय अधीक्षक, नांदेड मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य आरोग्य निरीक्षक, नांदेड मंडळ यांनी रेल्वे कॉलनीतील रहिवासी व प्रवाशांच्या विनंतीनुसार नांदेड महानगरपालिका कार्यालयाशी संपर्क साधून भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी विशेष मोहीम राबविली.
या मोहिमेदरम्यान रेल्वे कॉलनी व रेल्वे स्थानक परिसरात फिरणाऱ्या अनेक भटक्या कुत्र्यांना नांदेड महानगरपालिकेच्या सहकार्याने पकडून योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्यात आले. तसेच भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी त्यांचे नसबंदीकरण व लसीकरण करण्याची कार्यवाही महानगरपालिकेच्या डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून करण्यात आली.
दि. २१ ऑगस्ट आणि २४ ऑगस्ट २०२६ रोजी मंडळ रेल्वे व्यवस्थापक (DRM) कार्यालय तसेच त्यास लागून असलेल्या रेल्वे कॉलनीमध्ये विशेष मोहीम राबवून अनेक भटक्या कुत्र्यांना पकडण्यात आले. यामध्ये काही आक्रमक/धोकादायक कुत्र्यांचाही समावेश होता. त्यांच्या योग्य व्यवस्थापनामुळे रेल्वे कर्मचारी, कॉलनीतील रहिवासी व नागरिकांना भटक्या कुत्र्यांच्या समस्येपासून दिलासा मिळण्यास मदत झाली.
दरम्यान, रेल्वे कॉलनीतील रहिवाशांना घरातील अन्नकचरा किंवा खाद्यपदार्थ उघड्यावर अथवा रस्त्याच्या कडेला टाकू नयेत, असे आवाहन करण्यात आले. तसेच रेल्वे स्थानकावरील कॅन्टीन चालकांनाही अन्नकचरा इतरत्र न टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या. यामुळे परिसरात स्वच्छता राखण्यासोबतच भटक्या कुत्र्यांची संख्या व वावर नियंत्रित करण्यास मदत होईल.
या विशेष मोहिमेबद्दल रेल्वे कॉलनीतील रहिवासी, कर्मचारी व नागरिकांनी रेल्वेच्या वैद्यकीय विभागाच्या प्रयत्नांचे स्वागत करून समाधान व्यक्त केले आणि आभार मानले.