जिल्ह्यात 26 ते 28 ऑगस्टदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 25/08/2026 6:52 PM

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे दि. 26 ते 28 ऑगस्ट 2026 दरम्यान निघणाऱ्या पोळा मिरवणुका तसेच पंचक्रोशी यात्रा आणि नारळी पौर्णिमेनिमित्त होणाऱ्या विविध धार्मिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 36 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
माहूर येथे नारळी पौर्णिमेनिमित्त मोठ्या प्रमाणात पंचक्रोशी यात्रा भरणार आहे. या कालावधीत महाराष्ट्र व आंध्र प्रदेशातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. तसेच रेणुकामाता मंदिर, महादेव मंदिर, दत्तात्रय मंदिर, देवदेवेश्वरी, रेणुकामाता मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत ठेवणे तसेच यात्रेदरम्यान कायदा व सुव्यवस्था कायम राखणे आवश्यक असल्याने हे आदेश देण्यात आले आहेत.
आदेशाची अंमलबजावणी दि. 26 ऑगरोजीच्या मध्यरात्रीपासून ते दि. 28 ऑगस्ट 2026 रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत नांदेड जिल्ह्यातील पोलीस ठाणे माहूर हद्दीत पोलीस निरीक्षक तथा पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 36 नुसार विविध अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.
या अधिकारांतर्गत रस्त्यावरून किंवा रस्त्यावर जाणाऱ्या मिरवणुकीतील अथवा जमावातील व्यक्तींनी कोणत्या रीतीने चालावे व कसे वागावे, मिरवणुका कोणत्या मार्गाने व कोणत्या वेळी जाव्यात किंवा जाऊ नयेत, तसेच मिरवणुकीच्या मार्गात अडथळा निर्माण होणार नाही याबाबत निर्देश देण्याचे अधिकार संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
तसेच मिरवणुका व जमावाच्या प्रसंगी पूजा-अर्चेच्या ठिकाणी गर्दी होऊन रस्ता किंवा सार्वजनिक जागेत अडथळा निर्माण होऊ नये, रस्ते व रस्त्यांच्या आसपास वाहने व्यवस्थित उभी राहतील याची दक्षता घ्यावी, सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपकांच्या आवाजावर नियंत्रण ठेवावे, याबाबत सूचना देण्याचे अधिकारही प्रदान करण्यात आले आहेत.
मिरवणुकीदरम्यान किंवा सार्वजनिक ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होईल, अशा कोणत्याही कृतीस प्रतिबंध करण्यासाठी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्याचे अधिकार राहणार आहेत. तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम 33, 35 ते 40 आणि 42, 43, 45 अन्वये यापूर्वी दिलेल्या आदेशांच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पोलीस ठाणे माहूर हद्दीत कार्यक्रम, मिरवणूक, सूचना, मार्ग व वेळ याबाबतची माहिती संबंधित पोलीस उपनिरीक्षक अथवा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय पूर्वप्रसिद्धीस देऊ नये, तसेच शांतता व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होईल अशा घोषणा देऊ नयेत, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर मुंबई पोलीस कायदा, 1951 मधील कलम 134 नुसार कारवाई करण्यात येईल. सदर प्रतिबंधात्मक आदेश दि. 26 ऑगस्ट 2026 रोजीच्या मध्यरात्रीपासून ते दि. 28 ऑगस्ट 2026 रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहेत.

Share

Other News

ताज्या बातम्या