नांदेड : नांदेड तालुक्यातील आपले सरकार सेवा केंद्रांची गुणवत्ता वाढवून नागरिकांना उपलब्ध होणाऱ्या सेवांचा दर्जा अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने तहसील कार्यालयाच्या सभागृहात आज आपले सरकार सेवा केंद्र चालकांची विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेस नांदेडचे उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी अजय शिंदे, नायब तहसीलदार (महसूल) सुनील माचेवाड यांनी उपस्थित सेवा केंद्र चालकांना मार्गदर्शन केले. यावेळी आपले सरकार सेवा केंद्र जिल्हा प्रकल्प अधिकारी नीरज धामणगावे, जिल्हा समन्वयक केदार चोपडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
महाराष्ट्र शासनाच्या इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाच्या निर्देशानुसार तसेच जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार आपले सरकार सेवा केंद्रांमध्ये आवश्यक पायाभूत सुविधा, नागरिकांसाठी सोयी-सुविधा, योग्य ब्रँडिंग, माहिती फलक, तांत्रिक सुविधा तसेच नागरिकाभिमुख सेवा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. या निकषांची पूर्तता करून केंद्रांचे गुणवत्ता मानांकन सुधारण्याबाबत कार्यशाळेत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
आपले सरकार सेवा केंद्र तसेच ग्रामपंचायत स्तरावरील सेवा केंद्रांचे गुणवत्ता मानांकन, कार्यपद्धती आणि सन्मानाची प्रक्रिया अधिक प्रभावी करण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. नागरिकांना वेळेत, पारदर्शक व गुणवत्तापूर्ण सेवा देण्याच्या सूचना सर्व सेवा केंद्र चालकांना देण्यात आल्या.
शासनाने निश्चित केलेल्या निकषांनुसार आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्यास अथवा नियमांचे पालन केले जात नसल्यास नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी दिला. तसेच नियमबाह्य पद्धतीने काम करणाऱ्या किंवा शासनाच्या निर्देशांचे सातत्याने पालन न करणाऱ्या सेवा केंद्र चालकांवर परवाना रद्द करण्यासह नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, अशा सूचना देण्यात आल्या.
या कार्यशाळेस नांदेड तालुक्यातील आपले सरकार सेवा केंद्र चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांना अधिक दर्जेदार, पारदर्शक आणि सुलभ सेवा देण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.