नांदेड :- नांदेड येथील ज्येष्ठ निवेदक अॅड. गजानन पिंपरखेडे यांना त्यांच्या प्रदीर्घ सांस्कृतिक योगदानाबद्दल पंडित दीनदयाल उपाध्याय स्मृती प्रतिष्ठानतर्फे वर्ष २०२३ चा मानाचा “नांदेड भूषण पुरस्कार” जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या “नरेंद्र–देवेंद्र महोत्सव” या दोन दिवसीय काव्य मैफिलीत हजारो रसिकांच्या साक्षीने प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा स्वागताध्यक्ष शिवप्रसाद राठी व संयोजक धर्मभूषण अॅड. दिलीप ठाकूर यांनी केली आहे.*
अतिशय प्रतिष्ठेचा मानला जाणारा या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम रुपये ११,०००, स्मृतिचिन्ह, मानपत्र व महावस्त्र असे आहे.अॅड. पिंपरखेडे यांनी ग्रामीण कथालेखन, ध्वनिमुद्रण, निवेदन, रेडिओ कार्यक्रमांची संकल्पना, दूरदर्शन व डॉक्युमेंटरी क्षेत्रातील कार्य अशा विविध माध्यमांतून आपल्या प्रतिभेचा ठसा उमटविला आहे. मराठवाड्यातील लोककला, भक्तीपर परंपरा, संतविचार, ग्रामीण जीवनातील संघर्ष, संवेदना व संस्कृती यांचे शब्दांकन त्यांनी सातत्याने केले. त्यांच्या लेखनात मातीचा सुगंध, गावकुसाबाहेरील जगणे आणि सामान्य माणसाचे दुःख–सुख प्रभावीपणे उमटते.
कथाकथन, एकांकिका, ध्वनिफीत व सीडी स्वरूपातील निवेदनांतून त्यांनी मराठी व हिंदी भाषेत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले आहे. आकाशवाणी, दूरदर्शन, एचएमव्ही, तिरुपती यांसारख्या नामांकित संस्थांसोबत केलेल्या कार्यामुळे त्यांची ओळख राज्य व देशपातळीवर पोहोचली. विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे निवेदन, संकल्पना व सूत्रसंचालन करताना त्यांनी विषयाची गहनता, भाषेची सौंदर्यपूर्ण मांडणी आणि श्रोत्यांशी थेट नाते जपले. ‘ऑपरेशन उमरी बॅक’, ‘नांदेडचा महापूर’ यांसारख्या डॉक्युमेंटरींसह अनेक महत्त्वपूर्ण उपक्रमांत त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.
साहित्य, संगीत, लोकसंस्कृती आणि समाजसेवेच्या क्षेत्रातील त्यांच्या दीर्घकालीन, सातत्यपूर्ण व प्रेरणादायी कार्याला गौरव मिळावा, या उद्देशाने पंडित दीनदयाल उपाध्याय स्मृती प्रतिष्ठानतर्फे हा मानाचा “नांदेड भूषण पुरस्कार” प्रदान करण्यात येत आहे. त्यांच्या कार्यामुळे मराठवाड्याची सांस्कृतिक ओळख अधिक समृद्ध झाली असून, नव्या पिढीसाठी ते प्रेरणास्थान ठरले आहेत.अॅड. पिंपरखेडे यांच्या समवेत २०२४, २०२५ व २०२६ या तीन वर्षांच्या “नांदेड भूषण पुरस्कार” मानकऱ्यांचाही “नरेंद्र–देवेंद्र महोत्सवा” मध्ये सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शिवप्रसाद राठी व
भाजपा जिल्हा सरचिटणीस धर्मभूषण अॅड.दिलीप ठाकूर यांनी दिली.