शेतकऱ्यांनी शेवग्यापासून तयार केलेल्या पावडर, बिस्कीटाचा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी घेतला आस्वाद

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 22/01/2026 5:46 PM

नांदेड :- स्थानिक शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीस चालना देणारा व ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध करून देणाऱ्या शेवग्यापासून तयार करण्यात येणाऱ्या आरोग्यदायी पावडर व बिस्कीट निर्मिती उद्योगाचे औपचारिक अनावरण जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडले.

मनरेगा अंतर्गत किनवट तालुक्यातील अति प्रभावित मेगा पाणलोट (HIMWP-MH) प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेल्या विविध कामांची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी क्षेत्र भेट दिली. यावेळी शेवगा उत्पादक शेतकरी अभिजित जमादार यांच्या शेताला भेट देऊन किनवट तालुक्यात शेवगा उत्पादनाचे चांगले काम सुरू असल्याची माहिती घेतली. या भागात शेवग्यावर आधारित उद्योग उभारल्यास रोजगारनिर्मिती होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांचा गट निर्माण करून मनरेगा अंतर्गत शेवगा लागवडीचे काम मंजूर करण्याचे निर्देश दिले तसेच सहाय्यक जिल्हाधिकारी जेनीतचंद्रा दोन्तुला यांना ITDP विभाग व कृषी विभाग यांच्या समन्वयातून शेवगा प्रक्रिया युनिट उभारण्याच्या सूचना दिल्या. यानंतर सहाय्यक जिल्हाधिकारी जेनीतचंद्रा दोन्तुला यांनी ITDP अंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत २४.५० लाख रुपयांचा निधी मंजूर करून कृषी विभागाअंतर्गत स्थापित ‘वनश्री आदिवासी शेतकरी उत्पादक गट’ या गटास प्रक्रिया युनिट उभारणीस मान्यता दिली.

सदर गटाने प्राथमिक स्तरावर सोलर ड्रायर उभारून शेवगा पावडर, शेवगा बिस्कीट तसेच शेवगा चहा पावडरची निर्मिती सुरू केली आहे. या उत्पादनांची विक्री विविध मॉल, दुकाने, मेडिकल व स्थानिक बाजारपेठेत करण्यात येत आहे. उत्पादनांचे स्थानिक पातळीवर विपणन सहाय्यक जिल्हाधिकारी जेनीतचंद्रा दोन्तुला यांनी केले असून जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व उपजिल्हाधिकारी (रोहयो) हनमंत कोळेकर यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी जिल्हाधिकारी  राहुल कर्डिले यांनी सांगितले की, हा उद्योग अनुसूचित जमाती (ST) कुटुंबे, महिला शेतकरी तसेच इतर प्रवर्गातील शेतकरी व शेतकरी गटांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने सुरू करण्यात आला आहे. शेवगा पानांपासून पौष्टिक पावडर तयार करून मूल्यवर्धन करण्यात येणार असून त्यामुळे शेवगा उत्पादक शेतकऱ्यांना रोजगारासह त्यांच्या उत्पादनाला योग्य बाजारभाव मिळेल. स्थानिक पातळीवरच प्रक्रिया व विक्रीची सुविधा उपलब्ध होणार आहे.

“अशा प्रकारचे लघुउद्योग ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे असून पोषणमूल्याने समृद्ध असलेल्या शेवग्याच्या उत्पादनातून आरोग्य व रोजगार या दोन्ही क्षेत्रांना लाभ होईल. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन असे उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबवावेत,” असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी नोडल अधिकारी चेतन जाधव, प्रादेशिक समन्वयक दिनेश खडसे, CSO RAES तालुका समन्वयक रवी उबाळे, शेतकरी अभिजित जमादार व संदीप हुरदूके यांच्यासह संबंधित अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या