जलतारा – पाणीदार नांदेड मोहिमेंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचवा – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 21/01/2026 5:34 PM

नांदेड : – जलतारा – पाणीदार नांदेड या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत जलताराचा लाभ पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवून काम करण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जलतारा प्रकल्पाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मेघना कावली उपस्थित होत्या.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या संकल्पनेतून नांदेड जिल्ह्यासाठी सुमारे एक लाख जलतारे निर्माण करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, “Catch the Rain – Where it Falls, When it Falls” या संकल्पनेला अनुसरून जिल्हा प्रशासनामार्फत संपूर्ण जिल्ह्यात हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. पावसाचे अतिरिक्त पाणी शेतात मुरवून भूजलपातळी वाढविणे, जमिनीची धूप रोखणे, जमिनीची पोत सुधारणे व उत्पादनक्षमता वाढविणे हा या अभियानाचा मुख्य हेतू आहे.

या आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी तालुका निहाय जलतारा कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. शेतकऱ्यांकडून प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांना तात्काळ प्रशासकीय मंजुरी देऊन कामे सुरू करावीत, असे निर्देश देण्यात आले. तसेच मनरेगाच्या तांत्रिक सहाय्यकांमार्फत गावस्तरावर कॅम्प आयोजित करून प्रस्ताव तयार करावेत व अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवावा, असे स्पष्ट करण्यात आले.

तालुक्यांना देण्यात आलेली उद्दिष्टे ही किमान स्वरूपाची असून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार अधिक जलतारांचे प्रस्ताव प्राप्त झाल्यास सर्व प्रस्तावांना मान्यता देण्यात यावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रक्रियेत कोणतीही टाळाटाळ झाल्यास कठोर कार्यवाही करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.

मस्टर काढण्यासंदर्भात आतापर्यंत निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणी जिल्हास्तरावरून सोडविण्यात आल्या असून, मंजूर झालेल्या सर्व जलतारांचे मस्टर तात्काळ काढण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच या कामांचा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रत्यक्ष स्थळ भेटीद्वारे आढावा घेण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

यावेळी अति प्रभावित मेगा पाणलोट प्रकल्पांतर्गत सादर केलेल्या प्रस्तावांचाही आढावा घेण्यात आला. तसेच तालुका कृषी अधिकारी निहाय आढावा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी घ्यावा, असे निर्देश देण्यात आले.

या आढावा बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मेघना कावली, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड, नोडल अधिकारी चेतन जाधव, प्रादेशिक समन्वयक दिनेश खडसे, एमआयएस समन्वयक रूपेश झंवर, सर्व गट विकास अधिकारी, सर्व तालुका कृषी अधिकारी, मनरेगाचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक सहाय्यक, लिपिक-कम-संगणक चालक तसेच CSO प्रतिनिधी उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या