नांदेड :- नांदेड विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री. प्रदीप कामले यांनी मंगळवार, दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी नांदेड ते आदिलाबाद आणि आदिलाबाद ते नांदेड असा विशेष निरीक्षण दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी रेल्वेच्या सुरक्षितता, पायाभूत सुविधा आणि प्रवासी सुविधांशी संबंधित विविध कामांची सखोल पाहणी केली.
या दौऱ्यात नांदेड ते आदिलाबाद दरम्यान रियर विंडो निरीक्षण करण्यात आले. तसेच किमी 3/2-3 येथील लेव्हल क्रॉसिंग क्रमांक 1 (नॉन-इंटरलॉक्ड) ची पाहणी करण्यात आली. अमृत भारत योजनेअंतर्गत येणाऱ्या मुदखेड, भोकर, हिमायतनगर, किनवट आणि आदिलाबाद रेल्वे स्थानकांची सविस्तर तपासणी करण्यात आली.
याशिवाय किमी 5-6/2 येथील वळण क्रमांक 4, हिमायतनगर रेल्वे स्थानकाजवळील किमी 58/1-2 येथील पॉईंट क्रमांक 14-B, किमी 153/4-153/5 येथील स्टील गर्डर पूल क्रमांक 180 यांची पाहणी करण्यात आली.
विद्युत विभागाशी संबंधित कामांची तपासणी करताना ओव्हरहेड इक्विपमेंट डेपो, अंबारी तसेच किमी 138/5-6 येथील लेव्हल क्रॉसिंग क्रमांक 19 ऐवजी उभारण्यात आलेल्या रोड अंडर ब्रिज क्रमांक 171-A ची पाहणी करण्यात आली. याशिवाय किमी 146/3-4 येथील लेव्हल क्रॉसिंग क्रमांक 23 (नॉन-इंटरलॉक्ड) आणि किमी 155/5-6 येथील लेव्हल क्रॉसिंग क्रमांक 27 (नॉन-इंटरलॉक्ड) ची तपासणी करण्यात आली.
आदिलाबाद येथे क्रू लॉबी, रनिंग रूम तसेच पिट लाईन चीही पाहणी करण्यात आली. पाहणीदरम्यान श्री. कामले यांनी अधिकाऱ्यांना सुरक्षितता नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या तसेच प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
या दौऱ्यात नांदेड विभागातील इतर वरिष्ठ विभागीय अधिकारी उपस्थित होते.