नांदेड :- मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातंर्गत गाव पातळीवर पाणी व स्वच्छतेची कामे प्रभावीपणे राबवून गावे जलसमृद्ध व स्वच्छ ठेवण्याचे आवाहन जलजिवन मिशनचे प्रकल्प संचालक मयूर आंदेलवाड यांनी केले.
जलजीवन मिशन अंतर्गत पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा आढावा जिल्हा परिषद नांदेड येथे नुकताच घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल रावसाहेब यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मान्सूनपूर्व व मान्सूनपश्चात पाणी तपासणी, फील्ड टेस्ट किटव्दारे पाणी गुणवत्ता चाचणी, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान, पाण्याचा ताळेबंद, जल सेवा आकलन तसेच पाणी स्त्रोतांचे बळकटीकरण आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीस जिल्ह्यातील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता, आरोग्य विस्तार अधिकारी, पंचायत विस्तार अधिकारी, आरोग्य विभागाचे पर्यवेक्षक, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता तसेच भूजल सर्वेक्षण प्रयोगशाळेचे तंत्रज्ञ उपस्थित होते.
येत्या 26 जानेवारीपर्यंत जल सेवा आकलनाअंतर्गत ग्रामीण भागातील कुटुंबांना नियमित, पुरेशा प्रमाणात व स्वीकार्य गुणवत्तेचे पाणीपुरवठा करणे, तक्रारींचे योग्य निराकरण, वापरकर्ता शुल्क व पाणीपुरवठा यंत्रणेची तयारी याबाबतची माहिती संकलित करण्याच्या सूचनाही प्रकल्प संचालक मयूर आंदेलवाड व कार्यकारी अभियंता राहुल रावसाहेब त्यांनी दिल्या.
गावस्तरावर पाण्याचा ताळेबंद आराखडा तयार करताना पर्जन्यमानातून उपलब्ध होणारे पाणी, मातीतील ओलावा, भूजल, जलसंधारण कामांमुळे होणारा पाणीसाठा, कालवे, धरणे, तलाव व नद्यांमधून मिळणारे पाणी तसेच सर्व वापरांसाठी आवश्यक असलेले पाणी याचा वार्षिक आराखडा तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. याप्रसंगी जिल्हा पाणी गुणवत्ता सल्लागार कपेंद्र देसाई यांनी विषयावर सादरीकरण केले. या बैठकिला समाजशास्त्रा महेंद्र वाठोरे, लेखाधिकारी विठ्ठल चिगळे, वॉटर ऑर्गनायझेशन ट्रस्टचे गजानन हिवाळे, विजय कंधारे यांची उपस्थिती होती.