अतिवृष्टीने बाधित गावांतील नुकसानाची केंद्रीय पथकाकडून पाहणी

  • Mr.Ravikumar Shinde (Dhondpargon )
  • Upadted: 12/02/2026 5:58 PM



​अहिल्यानगर, दि. १२ - जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर आपत्तीपश्चात गरजांच्या मूल्यांकनासाठी केंद्र शासनाच्या उच्चस्तरीय केंद्रीय पथकाने आज, दि. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन झालेल्या नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी केली.

​या पथकामध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी एम. विनोद, वंदना श्रीवास्तव, सुहास मोहंती, रोहित कुमार, वैशाली म्हस्के आदी अधिकारी उपस्थित होते.

​पथकासोबत उपविभागीय अधिकारी प्रसाद मते, पाथर्डीचे तहसीलदार उद्धव नाईक, शेवगावचे तहसीलदार आकाश दहाडदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गुंजाळ, जिल्हा जलसंधारण अधिकारी पांडुरंग गायसमुद्रे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) भास्कर पाटील तसेच इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

​केंद्रीय पथकाने पाथर्डी तालुक्यातील करंजी, देवराई, पारेवाडी तसेच शेवगाव तालुक्यातील वरूर बु. या गावांना भेटी देत नुकसानग्रस्त ठिकाणांची पाहणी केली.

​करंजी येथे राष्ट्रीय महामार्गावरील नुकसानग्रस्त पुलाची, बंधाऱ्याची तसेच पाझर तलावाची पाहणी करण्यात आली. अतिवृष्टीमुळे खरडून गेलेली जमीन तसेच पिकांचे नुकसान झालेल्या ग्रामस्थांच्या शेतजमिनीची प्रत्यक्ष पाहणी करून पथकाने परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी ग्रामस्थ रफिक शेख यांच्याशी संवाद साधत नुकसानाची सविस्तर माहिती पथकाने जाणून घेतली.

​भविष्यात अशी आपत्तीजनक परिस्थिती उद्भवू नये, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचना पथकाने संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानंतर पथकाने देवराई येथील सिमेंट नाला बंधाऱ्याची, स्मशानभूमीची तसेच पारेवाडी येथे पाण्यामुळे क्षतिग्रस्त झालेल्या पुलाचीही पाहणी केली. जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पुलांची व बंधाऱ्यांची सविस्तर माहिती घेत आवश्यक त्या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

​शेवगाव तालुक्यातील वरूर बु. येथे पाण्यामुळे नुकसान झालेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेचीही पथकाने पाहणी करत नुकसानाची माहिती जाणून घेतली.

शेवगाव तहसील कार्यालयात आढावा 

​पाहणी दौऱ्यानंतर केंद्रीय पथकाने तहसील कार्यालय, शेवगाव येथे सर्व संबंधित अधिकाऱ्यांकडून नुकसानाच्या अनुषंगाने सविस्तर आढावा घेतला. तसेच नुकसानभरपाई व पुनर्बांधणी संदर्भातील विविध बाबींवर चर्चा करून आवश्यक त्या सूचना दिल्या.

#अतिवृष्टी #नुकसानभरपाई #अहिल्यानगर #केंद्रीयपथक #पाथर्डी #शेवगाव #शेतकरी #आपत्तीव्यवस्थापन #CentralTeamVisit #FloodRelief #MaharashtraAgriculture #AhilyanagarNews

Share

Other News

ताज्या बातम्या