मिरज जंक्शन व सांगली जिल्हयातील रेल्वे प्रश्नासाठी खासदार विशाल पाटील यांच्याकडे विविध मागण्या

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 17/08/2026 11:49 AM

सांगली, दि. १७ ऑगस्ट : मध्य रेल्वेच्या पुणे व सोलापूर विभागातील खासदारांची महत्त्वपूर्ण बैठक १९ ऑगस्ट रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर मिरज जंक्शन तसेच सांगली जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी रेल्वे प्रवासी संस्थेचे पदाधिकारी व सदस्य वाय. सी. कुलकर्णी आणि मध्य रेल्वे मुंबई प्रादेशिक रेल्वे प्रवासी सल्लागार समितीचे सदस्य किशोर भोरावत यांनी सांगलीचे खासदार मा. विशालदादा प्रकाशबापू पाटील यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

यावेळी गाडी क्रमांक ११४१९/११४२० कोल्हापूर–पुणे सह्याद्री एक्सप्रेसचा मुंबईपर्यंत विस्तार करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली. ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत नेणे शक्य नसल्यास पनवेल, दादर किंवा लोकमान्य टिळक टर्मिनस यापैकी योग्य ठिकाणी तिचा विस्तार करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.

तसेच मिरज जंक्शनच्या नूतनीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, त्याबाबत सातत्याने चालढकल होत आहे. हे काम तातडीने सुरू करून प्रवाशांना आधुनिक व आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली.

याशिवाय पुढील मागण्या खासदार विशाल पाटील यांच्यासमोर मांडण्यात आल्या—

- सकाळच्या सत्रात कोल्हापूर–मिरज–कलबुर्गी सुपरफास्ट एक्सप्रेस सुरू करण्यात यावी.
- कोल्हापूर–पुणे मार्गावर सकाळच्या सत्रात सुपरफास्ट इंटरसिटी एक्सप्रेस सुरू करण्यात यावी.
- भिलवडी रेल्वे स्थानकावरील फुट ओव्हरब्रिजचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करण्यात यावे.
- गाडी क्रमांक ११०३९/११०४० महाराष्ट्र एक्सप्रेस तसेच ११०२९/११०३० कोयना एक्सप्रेसला ताकारी स्थानकावर थांबा देण्यात यावा.
- मिरज जंक्शन येथे प्लॅटफॉर्म क्रमांक १ व २ यांच्या दरम्यान नवीन प्लॅटफॉर्म उभारण्यात यावा.
- गाडी क्रमांक ११४११/११४१२ सांगली–परळी एक्सप्रेस सध्या डेमूऐवजी ICF अथवा LHB डब्यांसह चालवून त्यामध्ये दोन स्लीपर कोच उपलब्ध करून द्यावेत.
- गाडी क्रमांक ११०२७/११०२८ सातारा–दादर एक्सप्रेस दररोज चालविण्यात यावी.

मिरज जंक्शन हे पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचे रेल्वे जंक्शन असून सांगली, कोल्हापूर, सातारा तसेच कर्नाटकातील प्रवाशांसाठी त्याचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या मागण्यांचा १९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या खासदारांच्या बैठकीत गांभीर्याने पाठपुरावा करून रेल्वे प्रशासनाकडून सकारात्मक निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती यावेळी करण्यात आली.

खासदार विशालदादा पाटील यांनी मिरज जंक्शन व सांगली जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका घेत संबंधित मागण्यांचा बैठकीत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

Share

Other News

ताज्या बातम्या