सांगली दि २८,
रोटरी क्लब ऑफ सांगली सिटी आणि स्नेहजित प्रतिष्ठान, कुपवाड यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली जिल्ह्यातील क्रीडा विकासाला नवी दिशा देण्यासाठी उद्याची दिशा — २०३० ची क्रीडा सांगली या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. ही माहिती रोटरीचे अध्यक्ष विष्णु शिंदे व स्नेहजित प्रतिष्ठानचे सचिव स्नेहल गौंडाजे यांनी दिली.
श्री. शिंदे, श्री. गौंडाजे यांनी सांगितले हा परिसंवाद *शनिवार, दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४.०० वाजता*, हुतात्मा स्मारक, मार्केट यार्ड चौक, सांगली येथे होणार आहे. क्रीडा दिनाचे औचित्य साधून हा परिसंवाद होत आहे.
ते म्हणाले, सांगली जिल्ह्याला समृद्ध क्रीडा परंपरा लाभली असून, अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू या जिल्ह्यातून घडले आहेत. मात्र, क्रीडा क्षेत्रात उपलब्ध असलेल्या संधी, सुविधा आणि क्षमतांचा अधिक प्रभावीपणे विकास करण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या क्रीडा विकासासाठी सर्वसमावेशक आणि कृतीशील आराखडा तयार करण्याच्या उद्देशाने या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
परिसंवादात पुढील प्रमुख विषयांवर चर्चा होणार आहे :
- क्रीडा क्षेत्रातील विद्यमान अडचणी व आव्हाने.
- ग्रामीण व शहरी भागातील क्रीडा सुविधांचा विकास.
- खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडा संघटना व प्रशासन यांच्यातील समन्वय.
- शालेय व महाविद्यालयीन स्तरावर क्रीडा संस्कृतीचा विकास.
- महिला, युवक आणि दिव्यांग खेळाडूंसाठी उपलब्ध संधी.
- आगामी काही वर्षांसाठी सांगली जिल्ह्याचा क्रीडा विकास आराखडा.
- क्रीडा क्षेत्रासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, प्रशिक्षण व मार्गदर्शन.
- स्थानिक पातळीवरून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी उपाययोजना.
या परिसंवादात क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञ, खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी, शिक्षक, पालक, सामाजिक संस्था, प्रशासनातील अधिकारी आणि क्रीडाप्रेमी नागरिक सहभागी होणार आहेत.
परिसंवादातून प्राप्त होणाऱ्या सूचना व शिफारशींचे संकलन करून सांगलीचा क्रीडा विकास रोडमॅप २०३० तयार करण्यात येणार आहे.
सांगली जिल्ह्याच्या क्रीडा विकासासाठी कार्यरत असलेल्या सर्व संबंधित व्यक्ती, संस्था आणि नागरिकांनी या परिसंवादास उपस्थित राहून आपले विचार, अनुभव व सूचना मांडाव्यात, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.