*सणासुदीच्या काळात कोविड वाढणार नाही याची दक्षता घ्या :-जिल्हाधिकारी अजय गुल्हाने*

  • Ashraf Ali (Chandrapur)
  • Upadted: 26/10/2021 9:44 PM



सणासुदीच्या काळात कोविड वाढणार नाही याची दक्षता घ्या.-जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

चंद्रपूर दि. 26 ऑक्टोंबर:  कोविडची दुसरी लाट उतरत असल्याचे जरी निदर्शनास येत असले, तरी सणासुदीच्या दिवसांमध्ये नागरिकांनी बाजारात गर्दी करणे टाळावे. कोविड वर्तणूक विषयक नियमांचे पालन कटाक्षाने करावे. दिवाळीच्या तोंडावर बाजारात होणारी गर्दी ही कोविडच्या संक्रमणाला आमंत्रण ठरू नये, याची खबरदारी सर्व नागरिकांनी, विक्रेत्यांनी व व्यापाऱ्यांनी घेण्याचे आवाहन  जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज केले आहे.

शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत शिथीलता दिली आहे. महाविदयालये, औदयोगिक आस्थापना, चित्रपटगृहे व अॅम्युजमेंट पार्क, खेळाडुंच्या सरावासाठी मैदाने, सांस्कृतिक कार्यक्रमांना अटी व शर्तीच्या अधिन राहून सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

लसीकरणाव्दारे कोविडवर मात करण्यात येत आहे. नुकतेच देशाने 100 कोटी लसीचा टप्पा पार पाडला आहे. तर दि.23 ऑक्टोबरपर्यत जिल्हयात 17 लक्ष 52 हजार 334  नागरिकांना लसीचे डोस देण्यात आले आहेत.

लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य  यंत्रणा युध्दपातळीवर कार्यरत आहे. मात्र, नागरिकांचा सहभागही मोलाचा आहे. मिशन युवा स्वास्थ अंतर्गत महाविदयालयीन 18 वर्षावरील सर्व विद्यार्थी तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोविड-19 चे लसीकरण प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी 25 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत मिशन युवा स्वास्थ्य मोहीमेचे आयोजन करण्यात आले आहे.

मिशन युवा स्वास्थ्य मोहिमेअंतर्गत महाविद्यालयामध्ये कोविड-19 लसीकरण विशेष सत्राचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये महाविद्यालयीन 18 वर्षावरील सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी एकही डोस घेतला नसल्यास, ज्यांनी पहिला डोस घेतला आहे व दुसरा डोससाठी पात्र आहे. अशांना दुसरा डोज देण्यात येईल. जे विद्यार्थी महाविद्यालयात जाऊन लस घेऊ शकतात त्यांनी महाविद्यालयातून लस घ्यावी. किंवा घराजवळील लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेऊ शकतात. जिल्हयातील ॲक्टीव्ह रूग्णांची दूहेरी संख्या ही काळजी वाढवणारी आहे. तरी, सर्व नागरिकांनी प्राधान्याने लसीकरण करून घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

मंगळवारी जिल्ह्यात एक कोरोनामुक्त, एक बाधित तर ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 23

गत 24 तासात जिल्ह्यात 1 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 1 नवीन रुग्ण बाधीत झाला आहे. जिल्ह्यात मंगळवारी मृत्यू संख्या शून्य आहे.

आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये बल्लारपूर येथे 1 रुग्ण आढळला असून चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्र, चंद्रपूर, भद्रावती, ब्रम्हपुरी, नागभीड, सिंदेवाही, मुल, सावली, पोंभूर्णा, गोंडपिपरी, राजूरा, चिमूर, वरोरा, कोरपना, जिवती व इतर  ठिकाणी बाधित रुगांची संख्या शून्य आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 810 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 245 झाली आहे. सध्या 23 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 7 लाख 29 हजार 35 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 6 लाख 38 हजार 932 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1542 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.


Share

Other News

ताज्या बातम्या