नांदेड : यंदाच्या माळेगाव यात्रेला प्लास्टिकमुक्त व स्वच्छ ठेवण्याचा संकल्प जिल्हा परिषदेने केला असून, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रेत स्वच्छतेवर विशेष भर देण्यात येत आहे.
प्लास्टिकमुक्ती व स्वच्छतेबाबत जनजागृतीसाठी जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी मयूर आंदेलवाड यांच्या मार्गदर्शनात माळेगाव यात्रेत मोठ्या प्रमाणावर विविध उपक्रम राबविण्यात येत असून, जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे कर्मचारी यात्रेतील विविध विक्री स्टॉल व दुकानदारांकडे भेट देऊन प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळावा याबाबत दुकानदार व ग्राहकांना समजावून सांगत आहेत.
माळेगाव यात्रा स्वच्छ ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला असून, सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य व ग्रामपंचायत अधिकारी यांनी संयुक्तपणे वेळापत्रक निश्चित करून ट्रॅक्टर व आवश्यक मनुष्यबळाची व्यवस्था केली आहे. सकाळी व रात्री, गर्दी कमी असलेल्या वेळेत ट्रॅक्टरद्वारे यात्रास्थळी कचरा संकलन करण्यात येत आहे.
तसेच विक्रेत्यांना कचरा साठवण्यासाठी स्वतंत्र बॅग देण्यात आल्या असून, त्या बॅगमधील कचरा घंटागाडी आल्यावर त्यामध्ये टाकण्यात येत आहे. या नियोजनबद्ध व्यवस्थेमुळे यात्रा परिसर स्वच्छ ठेवण्यास मोठी मदत होत आहे.
माळेगाव यात्रा प्लास्टिकमुक्त व स्वच्छ ठेवण्यासाठी विक्रेते व भाविकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.