अहिल्यानगर भूमि अभिलेख कार्यालयाबाबतची 'ती' बातमी दिशाभूल करणारी
अर्जदारास माहिती उपलब्ध करुनही प्रशासनाची बदनामी
उपअधीक्षक अविनाश मिसाळ यांचा खुलासा : अर्जदाराचा उद्देश केवळ प्रतिमा मलीन करण्याचा
अहिल्यानगर, दि.२० - माहिती अधिकार अर्जावर माहिती मिळूनही केवळ प्रशासनाची प्रतिमा मलीन करण्याच्या उद्देशाने, काही वर्तमानपत्रांत चुकीची बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित अर्जदारास कार्यालयाने माहिती आणि कागदपत्रे विनामूल्य उपलब्ध करून दिली असूनही, त्यांनी सत्याचा विपर्यास करत उपोषणाचा इशारा दिला आहे. याबाबतचे सविस्तर खंडन आणि खुलासा उपअधीक्षक भूमि अभिलेख, अहिल्यानगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सावेडी येथील जाकीर हबीब शेख यांनी १ जानेवारी २०२५ रोजी माहिती अधिकारात अर्ज करून कार्यालयातील शिरस्तेदार रवींद्र डिक्रूज यांच्या कामाची दैनंदिनी व कामाचा तपशील मागितला होता. मुळात अर्जदाराने अर्जावर 'दारिद्र्य रेषेखालील' (BPL) असा उल्लेख केला होता, परंतु त्याबाबतचा कोणताही वैध पुरावा जोडला नव्हता. तरीही प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत, तांत्रिक त्रुटी न काढता माहिती देण्याची तयारी दर्शविली होती.
या प्रकरणाची सुनावणी होऊन ७ नोव्हेंबर २०२५ रोजी माहिती देण्याचे आदेश झाले होते. त्या अनुषंगाने १५ डिसेंबर २०२५ रोजी अर्जदारास बोलावून संबंधित कर्मचाऱ्याच्या कामाची दैनंदिनी व माहिती 'विनामूल्य' पुरविण्यात आली आहे. तसेच, 'किती प्रकरणांची तपासणी केली' या प्रश्नाबाबत, हे काम दैनंदिन स्वरूपाचे असल्याने अर्जदाराने स्वतः कार्यालयात येऊन अभिलेखाची पाहणी करावी आणि हव्या असलेल्या नकला घ्याव्यात, असे स्पष्टपणे कळविण्यात आले होते.
मात्र, वस्तुस्थिती अशी असतानाही अर्जदाराने माहिती मिळाली नसल्याचा कांगावा करत, १४ व १८ डिसेंबर रोजी वर्तमानपत्रात चुकीच्या बातम्या प्रसिद्ध केल्या आणि २९ डिसेंबरपासून उपोषणाचा इशारा दिला. अर्जदाराने मागितलेली माहिती ही त्रयस्थ व्यक्तीची आहे आणि अर्जदाराचा या माहितीशी कोणताही थेट संबंध नाही. तरीही माहिती दिली गेली आहे. असे असतानाही केवळ प्रशासनावर दबाव टाकण्यासाठी व कार्यालयाची जनमानसातील प्रतिमा मलीन करण्यासाठी अर्जदाराने आकस बुद्धीने हे कृत्य केले आहे, असे या खुलाशात म्हटले आहे.
तसेच, अर्जदाराने यासंदर्भात राज्य माहिती आयुक्तांकडे केलेले अपील देखील फेटाळण्यात आले असल्याचे कार्यालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे जनतेने अशा दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन उपअधीक्षक अविनाश मिसाळ यांनी केले आहे.
#Ahilyanagar #अहिल्यानगर #BhumiAbhilekh #भूमीअभिलेख #Clarification #खुलासा #RTI #माहितीअधिकार #GovtUpdate #MaharashtraGovt #AhilyanagarNews #LandRecordsDepartment #सत्यमेवजयते #FactCheck #AhilyanagarAdmin #FakeNewsAlert #शासकीय_खुलासा