माळेगाव यात्रेत सागवानाचा देखणा कोरीव शिल्पसाज; वन प्रकल्प विभागाचे पहिल्यांदाच भव्य प्रदर्शन

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 22/12/2025 1:39 PM

श्री क्षेत्र माळेगाव यात्रा- मीडिया सेंटर, दिनांक 22 डिसेंबर- माळेगाव यात्रेत यंदा वन प्रकल्प विभागाच्या वतीने पहिल्यांदाच अस्सल गावरान सागवान लाकडापासून तयार केलेल्या कोरीव शिल्प व विविध उपयोगी वस्तूंचे भव्य प्रदर्शन भरविण्यात आले असून हे प्रदर्शन भाविक व नागरिकांचे विशेष आकर्षण ठरत आहे.
       किनवट येथील वन प्रकल्प विभागांतर्गत अल्लापल्ली येथील ओरिजनल सागवान लाकडापासून बनवलेल्या या कोरीव मूर्ती व वस्तू विक्रीसाठी माळेगाव यात्रेत दाखल झाल्या आहेत. अल्लापल्ली येथील सागवान हे शुद्ध, अस्सल व शासकीय दराने उपलब्ध असून या सागवानाचा वापर अयोध्या येथील श्री राम मंदिर, संसद भवन, सप्तशृंगी माता मंदिर, मुंबई येथील डी. वाय. पाटील क्रिकेट स्टेडियम यासारख्या प्रतिष्ठित ठिकाणी करण्यात आला आहे.
     या प्रदर्शनात भगवान गौतम बुद्ध, श्रीराम, श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज, साईबाबा, गणपती, महादेव आदींच्या आकर्षक कोरीव मूर्तींसह मोबाईल स्टॅण्ड, सजावटीच्या व शोभेच्या वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या सर्व मूर्ती एकाच सागवान लाकडातून कोरलेल्या असून कुठेही जोड वापरण्यात आलेला नाही. या वस्तूंच्या किमती 500 रुपयांपासून ते 10  हजार रुपयांपर्यंत आहेत.
       नागरिकांना घर, फार्महाऊस, कार्यालय, हॉटेल तसेच घरातील फर्निचर सागवान लाकडापासून तयार करता येऊ शकते. हे सागवान सहा ते साडेसहा हजार घनफूट या प्रमाणात शासकीय दराने वन विभागामार्फत विक्रीस उपलब्ध आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशाह येथील शासकीय आरा मशीनमध्ये या कोरीव मूर्ती तयार केल्या जातात.
       या प्रदर्शनामागील मुख्य उद्देश रोजगारनिर्मिती करणे, सागवानाच्या शासकीय विक्रीबाबत जनजागृती करणे व वन प्रकल्प विभागाच्या कार्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे हा आहे. या उपक्रमासाठी विभागीय व्यवस्थापक उज्वला बांगर, सहाय्यक व्यवस्थापक जे.डी. पऱ्हाड, वनपरिक्षेत्र अधिकारी बी.बी. संदुपटलवा यांच्या मार्गदर्शनात वनपाल एस. डी. मुंडे, वनरक्षक ए. जी. डावखरे व एस. एम. सोमासे यांनी विशेष पुढाकार घेतला आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या