कुपवाड :- प्रतिनिधी
कुपवाड शहरातील विघ्नहर्ता कॉलनी परिसरात कचरा टाकण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून पती-पत्नीवर झालेल्या निर्घृण हल्ल्यात पत्नी मनीषा केसरेकर यांचा मृत्यू झाल्यानंतर उपचार सुरू असलेले त्यांचे पती मोहन केसरेकर यांचाही आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरातील नागरिकांसह महिला वर्गाच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेचे उपमहापौर गजानन मगदूम यांनी आज सकाळी घटनास्थळी भेट देऊन परिसरातील नागरिक तसेच मृत दाम्पत्याच्या नातेवाईकांची भेट घेतली. त्यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेतल्या.
आई-वडिलांच्या निधनामुळे दोन्ही मुलांवर मोठे संकट कोसळले आहे. ही बाब लक्षात घेऊन उपमहापौर गजानन मगदूम यांनी दोन्ही मुलांच्या शालेय शिक्षणाचा संपूर्ण खर्च तसेच इतर आवश्यक खर्चाची जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या या निर्णयामुळे मुलांना मोठा आधार मिळाला असून, नागरिकांनीही त्यांच्या संवेदनशील भूमिकेचे कौतुक केले.
दरम्यान, परिसरातील नागरिकांनी स्वच्छता, पथदिवे, रस्ते आणि सुरक्षेसह विविध समस्यांकडे उपमहापौरांचे लक्ष वेधले. नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्यानंतर मगदूम यांनी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी बोलावून नागरिकांच्या समस्या त्वरित सोडवून आवश्यक कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले.
घटनेनंतर नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती लक्षात घेऊन सदर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
यावेळी उपमहापौर गजानन मगदूम यांनी परिसरातील नागरिकांना आपला वैयक्तिक मोबाईल क्रमांक देत, “अर्ध्या रात्री कोणतीही अडचण आली तरी मला फोन करा. मी तुमच्यासाठी सदैव उभा आहे,” असा विश्वास दिला.
उपमहापौरांनी घेतलेल्या या पुढाकारामुळे भयभीत नागरिकांना मोठा मानसिक आधार मिळाला असून, परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.