कुपवाड : कुपवाड
सांगली परिसरातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना (MSME) आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन मिळावे आणि स्थानिक उद्योगांना निर्यात व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन, महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ आणि कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ इंडस्ट्रीज अँड कॉमर्स यांच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय खरेदीदारांशी संपर्क व व्यवहार कसा साधावा आणि MSME उद्योगांसाठी निर्यात क्षेत्रातील संधी’ या विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. एमआयडीसी कुपवाड येथील कृष्णा व्हॅली चेंबरच्या कार्यालयात झालेली ही कार्यशाळा उत्साहात पार पडली.
कार्यशाळेस संस्थेचे माजी सचिव चंद्रकांत पाटील, संचालक हरीभाऊ गुरव, फिओचे अक्षय एच. शाह तसेच तज्ज्ञ वक्ते विनायक टिमगिरे उपस्थित होते.
यावेळी तज्ज्ञ वक्ते विनायक टिमगिरे यांनी उपस्थित उद्योजकांना निर्यात व्यवसायातील विविध पैलूंबाबत सविस्तर व व्यावहारिक मार्गदर्शन केले. आंतरराष्ट्रीय खरेदीदारांचा शोध कसा घ्यावा, योग्य परदेशी बाजारपेठेचा अभ्यास कसा करावा, खरेदीदारांशी प्रभावी संवाद कसा साधावा, व्यवसायातील वाटाघाटी कशा कराव्यात, उत्पादनाचे प्रभावी सादरीकरण, निर्यात किंमत निश्चिती, गुणवत्ता तसेच आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच FIEOचे अक्षय एच. शाह यांनी 29 व 30 सप्टेंबर 2026 रोजी कोल्हापूर येथे होणाऱ्या Reverse Buyer-Seller Meet (RBSM) बाबत उपस्थित उद्योजकांना सविस्तर माहिती दिली. या माध्यमातून भारतीय निर्यातदारांना परदेशी खरेदीदारांशी थेट B2B संवाद साधण्याची तसेच नवीन व्यावसायिक संधी निर्माण करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. RBSMची पात्रता, नोंदणी प्रक्रिया आणि MSME उद्योगांना होणारे फायदे याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेला सांगली परिसरातील MSME उद्योजक, निर्यातदार तसेच विविध कंपन्यांचे एक्सपोर्ट प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित उद्योजकांनी कार्यशाळेतील मार्गदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत निर्यात व्यवसायासंदर्भातील विविध शंकांचे निरसन करून घेतले.
या प्रसंगी उद्योजक सुनील पवार, नरसिंहभाई पटेल, राहुल गुरव, अशोक मुळे, नाजिया शेख, सुभाष आरगे, सत्यजित शिंदे, अरुण शिंदे, अमीन गोलंदाज तसेच विविध कंपन्यांचे एक्सपोर्ट प्रमुख व उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृष्णा व्हॅली चेंबरचे व्यवस्थापक अमोल पाटील व मदन काटकर यांनी विशेष मेहनत घेतली.
उद्योजकांशी संपर्क, कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजनाची विविध जबाबदारी त्यांनी प्रभावीपणे पार पाडली. त्यांच्या प्रयत्नांमुळे कार्यशाळेला उद्योजकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
सांगलीतील MSME उद्योगांना स्थानिक बाजारपेठेपासून जागतिक बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक माहिती, मार्गदर्शन आणि व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त व महत्त्वपूर्ण ठरली.