ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

त्या १६८ रुग्णांच्या 'प्राण' वायुसाठी मुंबई मनपाने लावली बाजी !!!


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 4/20/2021 11:13:40 AM


ऑक्सिजन अभावी रुग्णांचा जीव धोक्यात येऊ शकतो हे लक्षात येताच क्षणाचाही विलंब न लावता मुंबई महापालिकेच्या वॉर्डबॉयपासून ते डॉक्टरांपर्यंत प्रत्येक कर्मचाऱ्याने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने एकाका रुग्णालयातून रुग्णांना ऑक्सिजनची व्यवस्था असलेल्या रुग्णालयात हलविण्यास सुरुवात केली. रात्री नऊ ते पहाटे साडेचारपर्यंत तब्बल १६८ रुग्णांना पालिकेच्या रुग्णालयांत सुखरुप पोहोचवले. या मोहिमेत आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, अधिष्ठाते , डॉक्टरांपासून ते वॉर्डबॉयपर्यंत सर्वांच्या हालचाली जणू काही लष्कराच्या एखाद्या गतिमान कारवाईसारख्या झाल्या…दरम्यान राज्यातील ऑक्सिजनची चणचण लक्षात घेऊन पालिकेने रोज ५० मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध होईल यासाठी एका कंपनीबरोबर करारही केला. यामुळे पालिकेला आता दररोज २८५ मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा होणार असल्याने मुंबईत तरी वैद्यकीय ऑक्सिजनची चणचण निर्माण होणार नाही.....

महापालिका अतिरिक्त आयुक्त ( आरोग्य) सुरेश काकाणी हे दररोज दुपारी पालिका रुग्णालयांतील रुग्ण, औषधसाठा, उपकरणे, ऑक्सिजन तसेच रेमडेसिवीरची परिस्थिती आदींचा आढावा घेतात. असाच आढावा घेत असताना पालिकेच्या काही रुग्णालयात पालिकेला पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांकडून ऑक्सिजन पोहोचला नसल्याचे कळले. पालिका रुग्णालयांना आयनॉक्स व लिंडा या दोन पुरवठादारांकडून रोज २३५ मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. सायंकाळी पुन्हा एकदा ऑक्सिजनचा पुरवठ्याचा आढावा घेतला असता लिंडाकडून पुरेसा साठा आला नसल्याचे लक्षात येताच काकाणी यांनी संबंधित पुरवठादारांना दूरध्वनी करून विचारणा केली. आमचे टँकर निघाले आहेत, ते रस्त्यात आहेत असे उत्तर मिळताच अतिरिक्त आयुक्तांनी टँकरचे लोकेशन तपासले तेव्हा वेळेत ऑक्सिजनचा पुरवठा होऊ शकत नाही हे लक्षात आले. त्याबरोबर ज्या रुग्णालयांना या टँकरने पुरवठा होणार होता तेथील डॉक्टरांशी त्यांनी तात्काळ संपर्क साधला व ऑक्सिजन तसेच अतिदक्षता विभागातील रुग्णांची माहिती घेतली. रात्री उशिरापर्यंत ऑक्सिजन टँकर पोहोचले नाहीत तर रुग्णांचे प्राण कंठाशी येऊ शकतात हे लक्षात घेऊन लगेचच आयुक्त इक्बालसिंग चहल यांना परिस्थितीची कल्पना दिली. लागोलाग वांद्रे भाभा, कुर्ला भाभा, बोरिवलीतील भगवती रुग्णालय, गोवंडी येथील शताब्दी रुग्णालय, मुलुंडचे एम.टी. अग्रवाल व जोगेश्वरी येथील ट्रॉमा सेंटरमधील १६८ रुग्णांना अन्यत्र हलविण्याचा निर्णय घेण्यात आला.

यासाठी युद्धपातळीवर पालिका उपायुक्त, सहाय्यक आयुक्त तसेच अधिष्ठाता व संबंधित रुग्णालयांच्या प्रमुखांची ऑनलाईन बैठक घेण्यात आली. याबाबत अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांना विचारले असता ते म्हणाले, “ती वेळच अशी होती की तात्काळ निर्णय घेणे गरजेचे होते. ऑक्सिजन खाटेवर असलेल्या तसेच अतिदक्षता विभागात असलेल्या रुग्णांना योग्य ठिकाणी व सुरक्षितपणे हलवणे एक आव्हान होते. यासाठी किती रुग्णवाहिका लागतील तसेच कोणत्या रुग्णांना कोणत्या प्रकारची रुग्णवाहिका लागेल, त्यांची उपलब्धता याचा आढावा घेतला. कोणत्या रुग्णालयात किती बेड उपलब्ध होतील ते तपासले. त्यानुसार टीम तयार करून एकेका रुग्णालयातून रात्री नऊ वाजल्यापासून रुग्ण हलविण्यास सुरुवात केली. पहाटेपर्यंत १६८ रुग्णांना सुरक्षितपणे पालिकेच्या अन्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा केली हे जसे खरे आहे तसेच दैव बलवत्तर होते…कारण रात्री कुठेही रुग्णांना बसवताना वाहतुकीचा सामना करावा लागला नाही. यातून एक स्पष्ट होते ते म्हणजे पालिकेकडे पुरेशा ऑक्सिजनच्या खाटा उपलब्ध आहेत. आजच काही राज्यात एकेका खाटेवर दोन दोन रुग्ण झोपलेले दिसतात”.

मुंबईत आम्ही योग्य पद्धतीने खाटा वाढवत आहोत तसेच रुग्ण नियोजन करत आहोत असे सांगून काकाणी म्हणाले, लष्कराच्या नियोजनबद्ध हालचालींप्रमाणे काल पालिका कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावून रुग्णांना अन्य रुग्णालयात हलवले. अगदी वॉर्डबॉय, परिचारीकांपासून अधिष्ठाते तसेच वरिष्ठ अधिकार्यांनी वेळकाळ न पाहाता काम केल्यानेच पहाटेपर्यंत आम्ही या रुग्णांना सुरक्षितपणे पालिकेच्या अन्य रुग्णालयांत दाखल करू शकलो. खरतर महापालिकेकडे ऑक्सिजनचा कोणताही तुटवडा नाही. एका पुरवठादाराच्या गाड्या वेळेत आल्या नाहीत म्हणून कालचा प्रसंग उद्भवला. मात्र राज्यभरातील रुग्णवाढ लक्षात घेऊन आम्ही रोज ५० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा यासाठी एका कंपनीबरोबर करार केला आहे. पालिकेच्या जम्बो रुग्णव्यनस्थेसह सर्व रुग्णालयात मिळून एकूण २०४५६ खाटा आहेत. त्यापैकी ४००८ खाटा आजच्या दिवशी रिकाम्या आहेत. यात १०,०६९ ऑक्सिजन खाटा, २७५१ अतिदक्षता विभागात खाटा तर व्हेंटिलेटरच्या १४१४ खाटा आहेत. यात व्हेंटिलेटरच्या २१ खाटा रिकाम्या आहेत तर ऑक्सिजनच्या ८८० आणि अतिदक्षता विभागात ५६ खाटा उपलब्ध आहेत. सध्या रुग्णांसाठी साधारणपणे दररोज २१० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज लागत असून आमच्याकडे २३५ मेट्रिक टन साठा असतो. याशिवाय ५० मेट्रिक टन साठा नव्याने उपलब्ध होणार असल्याने पालिकेच्या रुग्णांसाठी एकूण २८५ मेट्रिक टन ऑक्सिजन रोज उपलब्ध होणार असल्याचे सुरेश काकाणी यांनी सांगितले.
कालची घटना ही आमच्यासाठी एक युद्धजन्य परिस्थिती होती असे सांगून अतिरिक्त आयुक्त म्हणाले, राज्यातील ऑक्सिजनचा तुटवडा लक्षात घेऊन पालिकेने काही दिवसांपूर्वी मुंबईतील रुग्णालयांच्या १५० हून जास्त डॉक्टरांची ऑनलाईन बैठक घेऊन ऑक्सिजनचा सुयोग्य वापर तसेच गळती वा अतिरिक्त वापर टाळण्यासाठी काय काळजी घ्यायला पाहिजे त्याची सुस्पष्ट कल्पना दिली तसेच केंद्र सरकार आणि राज्य कृती दलाची मार्गदर्शक तत्वे या सर्व रुग्णालय प्रतिनिधींना दिली.

#आमची_मुंबईमहानगरपालिका ❤️❤️

Share

Other News