श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमनिमित्त कार्यक्रम;आरोग्य शिबिरात २५० डॉक्टरांच्या पथकाद्वारे भाविकांची मोफत तपासणी व उपचार; पहिल्याच दिवशी सुमारे साडेपाच हजार जणांनी घेतला लाभ;कर्करोग व एंडोस्कोपी सुविधाही उपलब्ध

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 24/01/2026 8:30 PM

नांदेड : शीख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम सोहळ्यानिमित्त नांदेडमधील मोदी मैदानावर भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सेवेसाठी आरोग्य विभाग आणि मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये २५० हून अधिक तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून भाविकांना मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार सेवा पुरविण्यात येत आहेत.

आजपासून मोदी मैदानावर सुरू झालेल्या या आरोग्य शिबिराला भाविकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आरोग्य विभागाने या ठिकाणी १२ सुसज्ज दालने उभारली असून, शासकीय यंत्रणेसह खाजगी रुग्णालयांच्या सहभागाने ही सेवा अखंडितपणे दिली जात आहे.

अद्ययावत आरोग्य सुविधा आणि तज्ज्ञांची फौज श्री गुरु तेग बहादूर साहिबजी दरबार या मुख्य मंडपाच्या दोन्ही बाजूस उभारण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात भाविकांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी तैनात करण्यात आली आहे.  यामध्ये विविध वैद्यकीय शाखांमधील २५० डॉक्टरांचा समावेश आहे. मुख्य कार्यक्रमस्थळी २ बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) आणि ५ खाटांचे तात्पुरते रुग्णालय उभारण्यात आले आहे. येथे असंसर्गजन्य रोग, दंतरोग, महिलांचे आजार, मधुमेह, हृदयरोग, आणि क्षयरोग यांसारख्या आजारांवर तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत सल्ला व उपचार दिले जात आहेत.

पोटाच्या विकारांसाठी 'एंडोस्कोपी' आणि 'कर्करोग तपासणी' (कॅन्सर स्क्रिनिंग) यांसारख्या महागड्या चाचण्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून पूर्णपणे मोफत केल्या जात आहेत. मुख्यमंत्री सहायता निधी कार्यालयामार्फत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, गरजू रुग्णांना मोफत चष्मे वाटप केले जात आहेत. तसेच, आवश्यकतेनुसार ज्येष्ठ नागरिकांना आधारासाठी काठीचे वाटपही करण्यात येणार आहे.

आपत्कालीन सज्जता कोणत्याही वैद्यकीय आणीबाणीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने चोख व्यवस्था ठेवली आहे. कार्यक्रमस्थळी ५ बेडचा अद्ययावत अतिदक्षता कक्ष (आयसीयू) स्थापन करण्यात आला आहे. तसेच, शहरात 'अँडव्हान्स लाईफ सपोर्ट' (एएलएस) प्रणाली असलेल्या २५ आणि 'बेसिक लाईफ सपोर्ट' (बीएलएस) प्रणाली असलेल्या ४०, अशा एकूण ६५ रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके यांनी दिली.       
  

*आरोग्य शिबिरात पहिल्याच दिवशी ५,२४९ रुग्णांनी घेतला लाभ*

“हिंद दी चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या शहीदी समागम कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरास भाविक व नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. आज सायंकाळी ७ वाजेपर्यंत एकूण ५ हजार २४९ रुग्णांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.

या शिबिरामध्ये १,०८० रुग्णांची हाडांची तपासणी, २,९६७ रुग्णांची नेत्र तपासणी, ४३७ रुग्णांची आयुष तपासणी, तर ६४२ रुग्णांची एनसीडी (असंसर्गजन्य आजार) स्क्रीनिंग करण्यात आली. तसेच १६ रुग्णांना इंजेक्शन, ८८ रुग्णांची ईसीजी तपासणी, १३१ लहान मुलांची आरोग्य तपासणी, आणि ७७ महिलांची स्त्रीरोग तपासणी करण्यात आली. यासोबतच सर्जरी विभागामार्फत ७२ रुग्णांची तपासणी, ३४ जणांची अवयवदान नोंदणी, ५८७ रुग्णांना चालण्यासाठी आधाराची काठी, तर १,७९९ रुग्णांना चष्म्यांचे वाटप करण्यात आले. याशिवाय ३२ रुग्णांची मोतीबिंदू तपासणीही करण्यात आली.
भाविकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यासाठी राबविण्यात आलेल्या या व्यापक आरोग्य शिबिरामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

*हिंद दी चादर शहीदी समागमात भाविकांना उत्तम सुविधा; आरोग्य शिबिराचा लाभ घेत केले समाधान व्यक्त*   

 “हिंद दी चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या शहीदी समागम कार्यक्रमात सहभागी झालेल्या भाविकांनी आयोजकांनी उपलब्ध करून दिलेल्या सुविधांबाबत समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमात सहभागी झालेले भाविक गोपाळ हरी सावळे यांनी कार्यक्रमस्थळी चांगल्या सुविधा मिळत असल्याचे सांगत येथील आरोग्य शिबिरास भेट देऊन वैद्यकीय तपासणी करून घेतली. तपासणीनंतर आवश्यक औषधे तसेच चालण्यासाठी आधाराची काठी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे आभार मानले.
याचप्रमाणे श्रीमती लक्ष्मीबाई पुंड व श्रीमती उषाबाई सूर्यवंशी यांनीही कार्यक्रमात उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याबद्दल समाधान व्यक्त केले. आरोग्य शिबिरामार्फत तपासणी करून आवश्यकतेनुसार चष्मा देण्यात आल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे आभार मानले.
शहीदी समागमाच्या निमित्ताने भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमास नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, जनकल्याणकारी उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या