राजकीय क्षेत्रातील " दादा माणूस " हरवल्याचे दुःख : आमदार सुधीरदादा गाडगीळ

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 29/01/2026 10:56 AM

राज्याचे  उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणजे सळसळत्या उत्साहाने भारले गेलेले व्यक्तिमत्व होते. दादा कधी कंटाळले आहेत किंवा त्यांनी कोणत्याही विषयाकडे दुर्लक्ष केले आहे असे कधी घडले नाही. 
व्यक्तिशः माझे आणि दादांचे खूप स्नेहपूर्ण असे संबंध होते. मला ते नेहमीच आदराने आणि प्रेमाने वागवायचे. सांगली विधानसभा क्षेत्र किंवा सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रातील कोणतेही काम घेऊन गेलो तरीसुद्धा दादा लगेच त्याची दखल घ्यायचे. अधिकाऱ्यांना बोलावून आदेश द्यायचे. त्यांनी काही शंका उपस्थित केल्या तर 'हे लोकांच्या हिताचे काम आहे. झालेच पाहिजे', असे थेट सांगायचे. आमदार गाडगीळ कधीही व्यक्तिगत काम घेऊन येत नाहीत. लोकांची कामे घेऊन येतात असे ते नेहमी म्हणायचे. 
मी अकरा वर्षांपूर्वी सांगलीतून पहिल्यांदा आमदार झालो. त्यावेळी माझी त्यांची नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात भेट झाली होती. मला ते हसत हसत म्हणाले, "गाडगीळसाहेब, तुमचा पिढीजात सराफीचा व्यवसाय सोडून तुम्ही इकडे कुठे राजकारणाकडे आला आहात?"दादांनी माझ्या कोणत्याही कामाच्या बाबतीत त्यांनी कधीही दुजाभाव केला नाही. पक्षाचा किंवा पक्षीय राजकारणाचा विचार केला नाही.
राजकारणात अलीकडच्या काळात दिलेला शब्द पाळणारे फार थोडे लोक आढळतात. अजितदादा हे असा शब्द पाळणाऱ्यांपैकी प्रमुख होते. त्यांची स्मरणशक्ती आश्चर्यकारक होती. कोणत्याही जिल्ह्यातील किंवा तालुक्यातील कामाची त्यांना माहिती असे. 
 कोणत्याही कामाबद्दल प्रथम ते पूर्ण चौकशी करायचे. ते काम होत असेल तर अजिबात वेळ न लावता ते त्याबद्दल लगेच अधिकाऱ्यांना सूचना द्यायचे. ',पाहू विचार करू'असला वेळकाढूपणा त्यांच्याकडे कधी नव्हता. सगळा कारभार रोखठोक आणि थेट असा होता. एखादे काम होत नसेल तर नेता केवढाही मोठा असो त्याला थेट समोरासमोर सांगायलाही ते कमी करायचे नाहीत.
 लोकसभा निवडणुकीसाठी सांगली मतदारसंघातून संजयकाका पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादा सांगलीत आले होते. नंतर स्टेशन चौकात प्रचार प्रारंभाची सभाही झाली. सभेनंतर मी त्यांना म्हटले, 'माझे घर जवळच आहे. घरी चला' असा आग्रह केला.

पुढे जायला उशीर होईल, हेलिकॉप्टरने जाण्याऐवजी कोल्हापूरला जाऊन विमानाने जावं लागेल अशा कुठल्याही गोष्टींचा विचार न करता क्षणार्धात ते लगेच माझ्याबरोबर घरी आले. मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादा निवांत बसले. आस्थेने सगळ्यांची चौकशी केली. मनमोकळेपणाने कौटुंबिक गप्पा मारल्या. तुमच्या घरी येऊन बरं  वाटलं असं म्हणून ते कोल्हापूरला जाऊन विमानाने मुंबईला रवाना झाले.

सांगलीतील रस्ते, पूल किंवा शेरीनाल्याचा प्रश्न, नाट्यगृह यासारखे विषय त्यांच्यासमोर मांडले की अर्थमंत्री म्हणून ते तातडीने त्याबाबत कार्यवाही सुरू करायचे. महायुतीत आल्यानंतरच नव्हे तर त्यापूर्वीही त्यांच्याकडे कोणतेही काम घेऊन गेले तरी त्यांनी कधीही त्याबाबत टाळाटाळ केली नाही. त्यांच्या एवढा मोकळाढाकळा स्वभाव अलीकडे फारच दुर्मिळ झाला आहे. कार्यकर्त्यांची थेट बोलायचे. अगदी एखाद्या छोट्या गावापासून ते मुंबईपर्यंतचे सगळे प्रश्न त्यांना तळहातावरच्या रेषांसारखे चांगले माहित होते. असा तडफदार, अत्यंत उत्साही नेता ध्यानीमनी नसताना काळाच्या पडद्याआड गेला आहे. अजितदादा पवार म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातला एक चालता बोलता इतिहास आहे. त्या इतिहासावरील त्यांचा ठसा कधीही पुसला जाणार नाही. दादांच्या जाण्याने राज्याचे फार मोठे नुकसान झाले आहे. अर्थमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपद अतिशय समर्थपणे सांभाळणारे एक नेतृत्व आज आपल्यातून निघून गेले आहे. परंतु माझे वैयक्तिकरित्या सुद्धा फार मोठे नुकसान झाले आहे. कारण जवळचा मित्र आणि मार्गदर्शक ही माझ्या आयुष्यातील दादांची जागा भरून काढणे फार कठीण आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या