नांदेड :- यमुना प्रतिष्ठान, मुदखेड, नांदेड च्या वतीने सामाजिक जाणीवा वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने कै. गणपतराव उर्फ बापूसाहेब मेगदे (गुरुजी) यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त “स्मृती व्याख्यानमाला”मध्ये प्रा. युवराज पाटील यांचे “चला, कुटुंब जपू या” या विषयावर प्रभावी व्याख्यान होणार आहे. डॉ.जयश्री देशमुख तसेच धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांना “ कै. गणपतराव मेगदे (गुरुजी) स्मृती सेवा गौरव पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती ॲड. उमेश मेगदे (अध्यक्ष) व रमेश मेगदे (सचिव) यांनी दिली आहे. हा कार्यक्रम सोमवार, दि. २ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता, कुसुम सभागृह, व्हिआयपी रोड, नांदेड येथे संपन्न होणार आहे.
समाजाला दिशा देणारे विचार, मूल्याधिष्ठित जीवन आणि विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करण्याचे कार्य आयुष्यभर करणारे बापूसाहेब मेगदे (गुरुजी) यांच्या स्मृती जपण्यासाठी गेल्या तेरा वर्षापासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमात अविरत आरोग्य सेवा व समाजसेवेसाठी जीवन समर्पित केल्याबद्दल डॉ. सौ. जयश्री देशमुख यांना “मातोश्री कै.श्रीमती शंकूतलाबाई गणपतराव मेगदे स्मृती सेवा गौरव पुरस्कार” प्रदान करण्यात येणार आहे. तसेच समाजसेवा व धर्मकार्याकरिता जीवन अर्पण करणारे धर्मभूषण दिलीपसिंह ठाकूर यांना “कै. गणपतराव मेगदे (गुरुजी) स्मृती सेवा गौरव पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्कार स्वरूपात शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह व रोख रक्कम ₹ अकरा हजार देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनील वेदपाठक (प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, नांदेड) हे असणार असून प्रमुख वक्ते म्हणून नामवंत साहित्यिक व वक्ते प्रा. युवराज पाटील उपस्थित राहणार आहेत. या वेळी “चला, कुटुंब जपूया” या विषयावर प्रभावी व्याख्यान होणार असून, सामाजिक सलोखा, कुटुंबसंस्था आणि मूल्यसंवर्धन यावर मार्गदर्शन केले जाणार आहे.
या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक ॲड. उमेश मेगदे (अध्यक्ष) व रमेश मेगदे (सचिव) यांनी केले आहे. यमुना प्रतिष्ठान, मुदखेड व समस्त मेगदे परिवाराच्या वतीने हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.दिलीप ठाकूर यांना हा 108 वा पुरस्कार मिळत असल्यामुळे सर्वच स्थरातून त्यांचे कौतुक होत आहॆ.