सांगली: उन्हाळ्यातच सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. मान्सूनचे देखील लवकरच आगमन होणार आहे. त्यामुळे सांगली जिल्हा व सांगली शहरातील संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी जिल्हाधिकारी व मनपा कार्यालयात आपत्ती व्यवस्थापनची आढावा बैठक घ्यावी, अशी मागणी लोकहित मंचचे मनोज भिसे यांनी केली आहे.
ते म्हणाले, जिल्ह्यात दरवर्षी 15 जूननंतर मान्सून सक्रिय होतो. सध्या मे महिना असला तरी देखील गेल्या चार दिवसांपासून सातारा, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. सातारा जिल्ह्यात पाऊस असल्याने नदी व धरणाच्या पाणी साठ्यात वाढ होऊ लागली आहे. साधारण जुलै, ऑगस्टमध्ये अशी परिस्थिती निर्माण होते, परंतु यंदा मे महिन्यातच वळीव पावसाने दमदार हजेरी लावल्याने नद्यांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली. याचा परिणाम म्हणून सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी देखील वाढली आहे.
मान्सून देखील काही दिवसात सक्रीय होणार असल्याचे हवामान विभागाच्यावतीने सांगण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात सांगली शहर व कृष्णा-वारणा काठावरील सांगली जिल्ह्यातील गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होईल, अशी शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर तातडीने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी बैठक घेणे आवश्यक आहे. मनपा प्रशासन व जिल्हा प्रशासन यांच्याकडे असलेली आपत्ती यंत्रणा, पुढील नियोजन याचा आढावा घ्यावा जेणेकरून संभाव्य पूरपस्थितीवर मात करता येईल, असे मत मनोज भिसे यांनी व्यक्त केले आहे.