आरटी आय न्यूज नेटवर्क
(विजय जगदाळे)
स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृह सातारा
सातारा, दि. : सातारा जिल्हा हा डोंगर दऱ्यांमध्ये वसलेला जिल्हा आहे. लोकांच्या कल्याणांच्या योजना ग्रामीण भागात सर्वदूर पोहचल्या पाहिजेत. सार्वजनिक हिताची कामे नेटाने व पद्धतशीर झाली पाहिजेत. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून साकारलेले मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे जिल्ह्यात यशस्वीपणे राबविले जावे, यासाठी सर्व सरपंच, ग्रामसेवक व सदस्य, सामाजिक संस्था, संघटना व प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी झोकून देवून काम करावे. या अभियानाबद्दल घराघरात जावून जागृती करावी व हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कार्यशाळेत ते बोलत होते. याप्रसंगी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, राज्य ग्रामीण विकास संस्थेचे संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमधून सक्षम नेतृत्व तयार होत असते. लोकनेते बाळासाहेब देसाई हे देखील 11 वर्ष लोकल बोर्डाचे अध्यक्षपद सांभाळत होते. पूर्वी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतींना मर्यादित निधी येत होता, त्या तुलनेत आता या संस्थांना स्वायत्तता आली आहे. त्यांच्याकडे येणारा निधी दूरदृष्टीने खर्च केला पाहिजे. सातारा जिल्हा स्वातंत्र्यापूर्वीपासूनच अनेक चळवळी यशस्वी करणारा, राज्याला, देशाला नेतृत्व देणारा जिल्हा आहे. सातारा जिल्ह्यातील आदर्श शाळा माझी शाळा, आदर्श प्राथमिक आरोग्य केंद्र हे उपक्रम अत्यंत यशस्वी करुन सातारा जिल्ह्याने पॅटर्न निर्माण केला. आता मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानही यशस्वी करण्यासाठी सर्वांनी अपार मेहनत घेऊया, असेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी ग्रामपंचायत, नगर पालिका व शहरे ही स्वच्छ असावी सातारा जिल्हा सुंदर जिल्हा करावा यासाठी गुडमॉर्निग पथकाप्रमाणे पथके तयार करा, अशा सूचनाही त्यांनी कार्यशाळेप्रसंगी दिल्या.
यावेळी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री श्री. गोरे म्हणाले, गावागावात चळवळ उभी राहिल्याशिवाय परिवर्तन होत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ही ग्रामविकासाची चळवळ यशस्वी करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करुया. सातारा जिल्ह्याला चळवळीला मोठा इतिहास आहे, स्वराज्याची चळवळही याच मातीतून उभी राहिली. आता मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान ही चळवळी यशस्वी करण्यासाठी जिल्हा वासियांनो सज्ज व्हा. शासन आपल्या पाठीशी आहे, असे सांगून हे अभियान म्हणजे विकासाभिमुख नेतृत्व सिद्ध करणारी स्पर्धा आहे.