कोल्हापूर (प्रतिनिधी) : पत्रकार बांधवांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी गेली १६ वर्षे सातत्याने कार्यरत असलेल्या कोल्हापूर युवा पत्रकार संघाच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त आज अन्नदान वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन दैनिक पुढारीचे वरिष्ठ पत्रकार अनिल देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या वेळी संघाचे अध्यक्ष शिवाजी शिंगे, सचिव शरद माळी, कोल्हापुरी थाळीचे प्रमुख उदय प्रभावळे, विवेक पोर्लेकर, अजय शिंगे आणि कुणाल काटे, विपुल शिरगावकर, उपस्थित होते. संघटनेच्या वतीने प्रत्येक वर्धापन दिन सामाजिक उपक्रमातून साजरा करण्याची परंपरा आहे. त्यानुसार यावर्षीही गरीब व होतकरू नागरिकांसाठी अन्नदान करण्यात आले.
पत्रकारिता ही जबाबदारी, धाडस आणि संकटांनी भरलेली वाट असल्याने अनेकदा पत्रकारांवर किंवा त्यांच्या कुटुंबीयांवर अडचणी येतात. अशा प्रसंगी संघटनेने केवळ पत्रकारांसाठीच नव्हे तर त्यांच्या कुटुंबीयांसाठीही आधार उभा केला आहे. शिक्षण, आरोग्य, अपघात मदत यांसारख्या अनेक क्षेत्रात केलेले योगदान उल्लेखनीय ठरले आहे.
फक्त पत्रकारांसाठीच नव्हे तर समाजासाठी काहीतरी देण्याची भूमिका संघटनेने गेल्या १६ वर्षांत कायम जपली आहे. पूरग्रस्तांना मदत, रक्तदान शिबिरे, अन्नदान, समाजोपयोगी, पत्रकार अभ्यास दौरा, समाजामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे व्यक्तींचा गुणगौरव यासह अनेक उपक्रमांच्या माध्यमातून संघटनेने सामाजिक बांधिलकीची परंपरा जपली आहे.
आजच्या कार्यक्रमात बोलताना उपस्थित मान्यवरांनी संघटनेच्या कार्याचा गौरव केला. पत्रकार संघटनांनी फक्त आपले हक्क जपण्यापेक्षा समाजासाठीही पुढे यावे, असे मत या वेळी व्यक्त करण्यात आले. कोल्हापूर युवा पत्रकार संघाने उभारलेली ही परंपरा इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल, अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली.
१६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित अन्नदान वाटप कार्यक्रमामुळे संघटनेचा प्रवास अधिक अर्थपूर्ण झाला असून आगामी काळातही पत्रकार बांधवांसोबत समाजासाठी सातत्याने काम करण्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला. शेवटी संघाचे सचिव शरद माळी यांनी आभार मानले.