फार्मर कप 2026 साठी कृषी विभाग सज्ज – दत्तकुमार कळसाईत

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 10/12/2025 5:10 PM

नांदेड :- पाणी फाउंडेशन आयोजित गटशेती प्रीमियर लीग (GPL) 2025 मध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लोहा तालुक्यातील शेतकरी गटांचा सन्मान सोहळा नुकताच उत्साहात संपन्न झाला. तालुक्यातील विविध गटांनी सुधारित शेती पद्धती, तांत्रिक अवलंब आणि सामूहिक कृतीद्वारे केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. या सोहळ्यामुळे आगामी फार्मर कप 2026 साठी तालुक्यात नवी उर्जा निर्माण झाली आहे.

कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत प्रमुख उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात लोहा तालुक्याच्या प्रगतीचे कौतुक करताना म्हटले की,
“गटशेतीच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याची वेळ आली आहे. कृषी विभाग सर्व गटांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील.”
त्यांनी शेतकऱ्यांनी शास्त्रीय शेती, हवामानानुकूल तंत्रज्ञान, शेतीशाळा आणि पाणी फाउंडेशनच्या निवासी प्रशिक्षणाचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत पुढे म्हणाले,
“नांदेड जिल्ह्यातील पानी फाऊंडेशनच्या कार्याचा खरा पाया म्हणजे लोहा तालुका पुढील वर्षी फार्मर कप जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत जाईल, मात्र मार्गदर्शक भूमिका बजावणारा तालुका म्हणून लोहा जिल्ह्यात ठळकपणे ओळखला जाईल.”

सह्याद्री फॉर्मचे कैलास सावंत यांनी आधुनिक व सुधारित शेती पद्धतींबाबत मार्गदर्शन केले. राजाभाऊ जाधव आणि उमेद जिल्हा व्यवस्थापक जंगलवाड यांनी विषमुक्त शेती व शेतीपूरक व्यवसाय यावर माहिती दिली.

बीआरएलएफचे दिनेश खडसे यांनी सेंद्रिय शेतीसोबतच नव्या कृषी उपक्रमांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष शिनगारे यांनी केले. मान्यवरांचे स्वागत पानी फाउंडेशनचे नांदेड विभागीय समन्वयक प्रवीण काथवटे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रणीता धड्डु व विक्रांत उजगरे यांनी केले तर समारोप सतीश भिसे यांच्या आभारप्रदर्शनाने झाला.

या सोहळ्यास मंडळ अधिकारी पोटपिलवार आणि उमेद अभियानाचे अरुटले उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राजेभाऊ कदम, प्रवीण खुळे, सागर गोरे आणि विशाल इंगळे यांनी परिश्रम घेतले.

सन्मान सोहळ्यानंतर शेतकरी गटांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले. जीपीएल 2025 मधील यशामुळे गटशेतीचे नव्या पर्व सुरू झाले असून फार्मर कप 2026 साठी लोहा तालुक्यात तयारी, आत्मविश्वास आणि स्पर्धेचा उत्साह वाढल्याचे शेतकऱ्यांनी व्यक्त केले.

Share

Other News

ताज्या बातम्या