स्वारातीम विद्यापीठात “आविष्कार २०२५-२६” चे भव्य आयोजन;विद्यापीठ परिक्षेत्रातील चार जिल्ह्यांतील १६८ स्पर्धकांचा सहभाग;४८ विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 10/12/2025 6:19 PM

नांदेड :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे “आविष्कार २०२५-२६” या विद्यापीठस्तरीय संशोधन स्पर्धेचे भव्य आयोजन दि. ९ डिसेंबर, २०२५ रोजी गणितीयशास्त्रे संकुलातर्फे करण्यात आले. विद्यापीठ परिक्षेत्रातील नांदेड, हिंगोली, परभणी आणि लातूर या चारही जिल्ह्यांतील विविध सहा विद्याशाखांमधून एकूण १६८ स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या स्पर्धेत पदवी, पदव्युत्तर आणि पीएच.डी. (ट्रिपल पी) स्कॉलर अशा तीन स्तरांवर स्वतंत्र गट तयार करण्यात आले होते. पदवी व पदव्युत्तर गटांत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे विजेते घोषित करण्यात आले, तर पीएच.डी. (ट्रिपल पी) स्कॉलर गटात प्रथम व द्वितीय क्रमांक निवडण्यात आला. सर्व फेऱ्यांतील एकत्रित गुणवत्तेनुसार एकूण ४८ स्पर्धकांची राज्यस्तरीय आविष्कार स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. मेघना कवळी (आय.ए.एस.), मेधव प्री-स्ट्रेस्ड पाईप प्रा.लि.चे संचालक अभिजित चंद्रकांत; तसेच नांदेडच्या एम.आय.डी.सी.चे प्रादेशिक अधिकारी राजाराम के. गुंथळे आणि श्रीनांदेडचे शैक्षणिक अधिकारी माधव सलगर उपस्थित होते. प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन व कुलसचिव डॉ. डी. डी. पवार यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
स्पर्धेचे संयोजन डॉ. एस. जे. वाढेर यांनी तर समन्वयक म्हणून डॉ. के. ए. बोगले व डॉ. रुपाली एस. जैन यांनी संपूर्ण स्पर्धेचे नियोजन आणि व्यवस्थापन प्रभावीपणे सांभाळले.
एम.आय.डी.सी.चे प्रादेशिक अधिकारी राजाराम गुंथळे यांनी विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांचे कौतुक करत “उद्योजकतेसाठी आवश्यक ते मार्गदर्शन व सहाय्य एम.आय.डी.सी. मार्फत उपलब्ध करून दिले जाईल,” असे आश्वस्त केले.
जिल्हा परिषद नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आय.ए.एस. सौ. मेघना कवळी यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देताना, “विद्यार्थ्यांची मेहनत, जिद्द आणि संशोधनातील नाविन्यपूर्ण दृष्टिकोन प्रशंसनीय असून हे प्रकल्प समाजोपयोगी ठरण्याची क्षमता बाळगतात,” असे सांगून अभिनंदन केले.
कुलगुरू डॉ. मनोहर चासकर म्हणाले, “आविष्कार ही स्पर्धा संशोधन संस्कृती अधिक बळकट करणारे व्यासपीठ आहे. विद्यार्थ्यांची सर्जनशीलता आणि प्रयोगशीलता हीच विद्यापीठाची खरी ताकद आहे.”
दिवसभर चाललेल्या पोस्टर प्रेझेंटेशन, मॉडेल डेमोन्स्ट्रेशन, नाविन्यपूर्ण संशोधन संकल्पना आणि वैज्ञानिक चर्चांमुळे आविष्कार स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विजेत्यांचा सत्कार करून त्यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. एस. जे. वाढेर यांनी केले, आभार प्रदर्शन डॉ. रुपाली जैन यांनी तर सूत्रसंचालन डॉ. नीना गोगटे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गणितीयशास्त्र संकुलातील सर्व प्राध्यापक, संशोधक व कर्मचार्यां्नी तसेच विद्यापीठातील विविध संकुलातील संचालक आणि प्राध्यापकांनी मोलाचे सहकार्य केले.

Share

Other News

ताज्या बातम्या