आरटी आय न्यूज नेटवर्क
(विजय जगदाळे)
नागपूर दि:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली आज नागपूर येथे 'महाराष्ट्र राज्य ग्रामविकास व कृषी विभागाची आढावा बैठक' पार पडली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नागपूर येथील केंद्रीय कृषी संशोधन परिषदेत कृषी आणि ग्रामविकास विभागांचा आढावा घेतला. यावेळी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी हवामानानुसार पीक वाण विकसित करणे, प्रगत बियाणे, सेंद्रिय खत, स्मार्ट सिंचन, आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यावर भर दिला. शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी सक्तीचा करण्याचे निर्देश दिले आणि महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून संपूर्ण सहकार्य मिळेल असे आश्वासन दिले.
मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, कमी पर्जन्यमानाच्या भागांसाठी अधिक उत्पादन देणारे वाण विकसित करावेत आणि राज्यासाठी सर्वोत्तम पीक पद्धती तयार कराव्यात. तसेच राज्यातील यशस्वी शेतकऱ्यांचे उदाहरण देत त्यांच्या यशोगाथा देशभर पोहोचवण्याचे निर्देश दिले. यावेळी ग्रामविकास विभागाच्या योजनांचा आढावा घेताना प्रधानमंत्री आवास, जनमन, ग्रामसडक योजना, मनरेगा यांचे सादरीकरण करण्यात आले. मनरेगातील प्रगतीबद्दल मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री यांनी समाधान व्यक्त केले.
मुख्यमंत्री यांनी 'माझी लाडकी बहीण' योजनेतून महिलांना आर्थिक आधार मिळाल्याचे सांगून ‘लखपती दीदी’ योजनेंतर्गत एक कोटी महिलांना स्वावलंबी करण्याचे लक्ष्य जाहीर केले. यावेळी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कृषी व ग्रामविकास क्षेत्रातील उपक्रमांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले.
या बैठकीला मंत्री जयकुमार गोरे, मंत्री माणिकराव कोकाटे,राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल तसेच केंद्र व राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.