सांगली, दि. 9,
शिराळा तालुक्याची निसर्ग संपदा समृद्ध असून, याठिकाणी पर्यटनास मोठा वाव आहे. पर्यटन वाढवून स्थानिकांच्या हाताला काम देण्याच्या दृष्टीने रोजगारवृद्धीसाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले.
शिराळा तालुक्याच्या पर्यटनवाढीच्या अनुषंगाने शिराळा येथे आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, चांदोली वन्यजीवच्या प्रकल्प उपसंचालक स्नेहलता पाटील, तहसीलदार शामला खोत पाटील, कार्यकारी अभियंता नितीश पोतदार, अमित भिसे, उपविभागीय अभियंता बाबासाहेब पाटील, ऋषिकेश पाटील, सुदामा कुंभार आदि उपस्थित होते.
बैठकीपूर्वी जिल्हाधिकारी काकडे यांनी चांदोली व्याघ्र प्रकल्प, चांदोली धरण, शिराळा येथील भुईकोट किल्ला याची पाहणी केली. यावेळी महसूल, वनविभाग, पाटबंधारे विभाग आदि विभागांचे अधिकारी सोबत होते.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, शिराळ्याचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्यासाठी शासन व खाजगी उद्योजक यांच्या एकत्रित गुंतवणुकीतून तीन वर्षात कोणत्या प्रकारे ही काम करता येईल याचा आराखडा तयार करण्यात येईल. याचबरोबर स्थानिक नागरिकांचा आर्थिकस्तर वाढविण्यासाठी पर्यटनस्थळ विकास करताना चांदोली परिसरातील ३० - ४० गावांचा समावेश करून एकत्रित विकास साधता येईल. यामधे निवास व न्याहरी, मध प्रकल्प आदि सुविधा उपलब्ध करून देता येतील. स्थानिक उत्पादनांची विक्रीही या माध्यमातून करता येईल. मुलांच्या शैक्षणिक सहली आयोजित केल्यास त्यांनाही येथील वनस्पती, प्राणी, राहणीमान, कौटुंबिक प्रेम आदिंबाबत माहिती होईल. पर्यटकांना वन्यप्राणी यांचे आकर्षण वाढेल, असे ते म्हणाले.