*मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यासह अनेक प्रश्न सरकारपुढे मांडण्याची कार्यकर्त्यांची मागणी*
सांगली : मुस्लिम समाजाच्या विविध समस्या, मागण्या आणि चालू घडामोडी संदर्भात आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अल्पसंख्यांक सेल (सांगली जिल्हा) आणि सांगली शहर मुस्लिम समाज समितीच्या वतीने माजी मंत्री आणि आमदार जयंत पाटील यांची भेट घेण्यात आली. या भेटीत समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करून एक निवेदन देण्यात आले.
यावेळी समाजातील मशिदींवरून काढण्यात आलेले भोंगे, शिक्षण, रोजगार, धार्मिक स्थळांचे संरक्षण, सरकारी योजनांचा लाभ अशा विविध मुद्द्यांवर चिंता व्यक्त करण्यात आली. मशिदींवरील भोंग्यांचा प्रश्न सरकार दरबारी ठामपणे मांडण्याची विनंती कार्यकर्त्यांनी केली.
आमदार जयंत पाटील यांनी सर्व मुद्द्यांवर समजून घेत मार्गदर्शन केले. तसेच, हे प्रश्न शासन दरबारी मांडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी सांगली शहर मुस्लिम समाज समितीचे मुफ्ती सुलेमान, हाफिज इरफान, रसूल भाई चौधरी, अब्दुल भाई शेख, इदगा कमिटीचे अल्ताफ भाई जमादार, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष आयुब भाई बारगीर, कार्याध्यक्ष इशाद भाई पखाली, शहर जिल्हा उपाध्यक्ष अजहर भाई सय्यद, इम्रान भाई पठाण तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.