चंद्रपूर: खासदार प्रतिभा सुरेश धानोरकर यांनी आज केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. चंद्रपूर महामार्गावर खड्ड्यांमुळे होणारे अपघात आणि त्यामुळे होणारी जीवितहानी थांबवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या निवेदनात चंद्रपूर महामार्गावरील गंभीर परिस्थितीकडे केंद्रीय मंत्र्यांचे लक्ष वेधले. जानाळा फाट्याजवळ खड्ड्यांमुळे झालेल्या दुर्दैवी अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आणि त्याला मागून येणाऱ्या ट्रकने चिरडले, तर चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील साखरवाही फाट्याजवळ रस्त्याच्या खराब स्थितीमुळे भरधाव वेगाने येणाऱ्या कारच्या धडकेत पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना त्यांनी नमूद केली. याव्यतिरिक्त, बामणी-राजुरा महामार्गावरील वर्धा नदीच्या पुलाजवळ एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचाही मृत्यू झाला आहे. या घटना आपल्या विभागाच्या घोर निष्काळजीपणाची आणि बेफिकीर कार्यपद्धतीची भयावह परिणाम दर्शवितात असे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी म्हटले आहे.
चंद्रपूर महामार्गावरील खड्ड्यांची समस्या नवी नाही, या संदर्भात वारंवार तक्रारी करूनही परिस्थिती "जैसे थे" असल्याचे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी निदर्शनास आणून दिले. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून , ही केवळ प्रशासकीय चूक नसून, नागरिकांच्या जीविताच्या सुरक्षेशी केलेला गंभीर खेळ आहे, असेही त्या म्हणाल्या.
याप्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली. या अपघातांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जबाबदार असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कठोर प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई करावी. तसेच, चंद्रपूर महामार्गावरील सर्व खड्डे आणि खराब रस्त्यांची युद्धपातळीवर दुरुस्ती करावी आणि भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना त्वरित लागू कराव्यात अशी मागणी त्यांनी केली.
याव्यतिरिक्त, अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना तातडीने आणि पुरेशी आर्थिक मदत देऊन त्यांना न्याय मिळवून द्यावा. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी, रस्त्यांच्या दुरुस्ती आणि देखभालीच्या प्रक्रियेवर कठोर आणि नियमित देखरेख ठेवण्यासाठी एक पारदर्शक व्यवस्था तातडीने स्थापित करावी असेही त्यांनी सुचवले.
चंद्रपूर महामार्गावर खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांवर अंकुश लावण्यासाठी तातडीने उपाययोजना करून दोषींवर नियमानुसार कारवाई करण्याची विनंती खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना केली.