नांदेड : सध्या वातावरणातील बदलामुळे अंगदुखी, डोकेदुखी, सर्दी, खोकला, ताप व घसा खवखवणे यांसारखे आजार मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. मात्र अशा आजारांवर उपचार करण्यासाठी अनेक नागरिक डॉक्टरांचा सल्ला न घेता परस्पर किराणा दुकाने व पानटपऱ्यांमधून औषधे खरेदी करून त्यांचे सेवन करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.
ही बाब आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असून, अशा प्रकारे अनधिकृत ठिकाणांहून औषधे घेणे मानवी शरीरासाठी घातक ठरू शकते. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधांचे सेवन केल्यास त्याचे दुरगामी व अपायकारक परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी परस्पर किराणा दुकाने, पानटपऱ्या किंवा इतर अनधिकृत विक्रेत्यांकडून औषधे खरेदी करू नयेत, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त औषधे अ.तु.राठोड यांनी केले आहे.
नागरिकांनी औषधांची खरेदी केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व अधिकृत औषध विक्रेत्यांकडूनच करावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, किराणा दुकाने, पानटपऱ्या व तत्सम आस्थापनांकडून सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, डोकेदुखी यावरील औषधांची खरेदी व विक्री करणे हे औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० व त्याखालील नियम १९४५ चे उल्लंघन ठरते. अशा प्रकारची बाब आढळून आल्यास संबंधित विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
तसेच नांदेड जिल्हा केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन यांनी सर्व किरकोळ व घाऊक औषध विक्रेत्यांना कायद्याच्या चौकटीत राहूनच औषधांची विक्री व वितरण करण्याबाबत त्यांच्या स्तरावरून सूचना द्याव्यात, असे आवाहनही करण्यात आले आहे.