पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाचे हिंगोली व नांदेड मध्ये छापे 73 लाख रुपयांच्या गुटख्यासह 1 कोटी 3 लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 19/01/2026 8:00 PM

नांदेड :- नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी आपल्या अधिनस्त अधिकारी व अंमलदारांना एकत्रित करून, हिंगोली व नांदेड शहरात चालणाऱ्या अवैध व्यवसायांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी पाठविले होते.

सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री तलेदवार व 5 अंमलदारांचा समावेश असलेल्या सदर पथकाने, प्रथमत आज पहाटे हिंगोली जिल्ह्यातील बाळापुर येथे कारवाई करत, तीन चारचाकी वाहनांमधून 14 लाख 67 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला असून नमूद प्रकरणात 10 लक्ष रुपयांची 3 चारचाकी वाहने देखील जप्त केली आहेत. सदर बाबत आरोपी करण सदाशिव अवचार, वय 20 वर्ष, रा. भोसी ता. कळमनूरी जि. हिंगोली व प्रभाकर दिगंबर अवचार, वय 32 वर्ष, रा. भोसी ता. कळमनूरी जि. हिंगोली यांचेविरुध्द पोलीस ठाणे आखाडा बाळापूर येथे गुरनं क्र. 26/2026 कलम 123,274,275, 323, 3(5) बीएनएस 26 (2), 27(2), 30 (2), 59 अन्न सुरक्षा मानके कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोनि श्री विष्णुकांत गुट्टे, पोस्टे आखाडा बाळापुर हे करत आहेत.

उपरोक्त कारवाईनंतर, सदर पथकाने नांदेड शहरातील इतवारा भागात गुटखा साठवलेल्या एका गोडाऊनवर कारवाई करून एकूण 58 लाख 26 हजार रुपयांचा गुटखा व माल पुरवणारा 20 लक्ष 50 हजार रुपयांचा एक ट्रक असा एकूण 78 लाख 76 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून सदर गुन्हयात शेख जिबरान शेख मुखीद, वय 26 वर्ष, रा. देगलूर नाका, जि. नांदेड व गणेश रामराव कऱ्हाळे, वय 26 वर्ष, रा. तिरुपती नगर, धनेगांव ता.जि. नांदेड या आरोपींना ताब्यात घेवून या संदर्भाने, पोलीस ठाणे इतवारा येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

वरील दोन्हीही ठिकाणांच्या छाप्यात पथकाने एकूण 72 लाख 93 हजार रुपयांचा गुटखा व 3 चारचाकी वाहने व 1 ट्रक असा एकूण 1 कोटी 03 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदर कारवाईत सपोनि श्री दशरथ तलेदवार यांचेसह पोहेकॉ प्रदिप खानसोळे, पोहेकॉ संजीव जिंकलवाड, पोकॉ/ गणेश धुमाळ, पोकों/ कामाजी गवळी यांनी सहभाग घेतला. सदर कामगिरीबाबत पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी पथकातील अधिकारी व अंमलदारांना 15,000 रुपयांचे बक्षीस घोषित केले आहे. सदर व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी आरोपींना आणखी कोणाचे पाठबळ होते का?, याचा शोध घेण्यात येत आहे.

आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती, नागरिकांनी नजीकच्या पोलीस ठाण्यास अथवा पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाच्या nandedrange.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर किंवा 'खबर' 91 50 100 100 या हेल्पलाइनवर कळवून अशा अवैध व्यवसायांचा बिमोड करण्यासाठी आपला हातभार लावावा, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या