नांदेड :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील भौतिकशास्त्र संकुलाच्या वतीने स्पेनमधील युनिव्हर्सिदाद ऑटोनोमा डी माद्रिद येथील वरिष्ठ प्राध्यापक प्रा. डॉ. जुआन गार्सिया-बेलिडो यांचे ‘गुरुत्वाकर्षण तरंगाचे विज्ञान’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन आज मंगळवार, दि.२० जानेवारी, २०२६ रोजी दुपारी ४.०० वाजता करण्यात आले आहे.
या व्याख्यानाचा लाभ विद्यापीठातील विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक तसेच विज्ञानप्रेमी नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील आणि भौतिकशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. राजाराम माने यांनी केले आहे.
शतकानुशतके खगोलशास्त्राचा अभ्यास प्रामुख्याने विद्युतचुंबकीय तरंगांच्या निरीक्षणावर आधारित होता. मात्र सन २०१५ पासून गुरुत्वाकर्षण लहरींच्या प्रत्यक्ष शोधामुळे या क्षेत्रात नव्या युगाची सुरुवात झाली आहे. आइन्स्टाईन यांनी सुमारे शंभर वर्षांपूर्वी भाकीत केलेल्या अवकाश आणि काळ या चारमिती रचनेतील लहरींचा शोध लागल्याने विश्वाकडे पाहण्याचा दृष्टीकोन अधिक व्यापक झाला आहे. कृष्णविवरांची टक्कर, न्यूट्रॉन ताऱ्यांचे विलयन तसेच बिग बँगच्या प्रतिध्वनी यांसारख्या अत्यंत रहस्यमय घटनांचा अभ्यास या लहरींच्या माध्यमातून शक्य झाला आहे.
विश्वरचनाशास्त्र आणि गुरुत्वाकर्षण लहरींच्या सिद्धांतातील अग्रगण्य तज्ञ असलेले प्रा. डॉ. जुआन गार्सिया-बेलिडो या व्याख्यानात गुरुत्वाकर्षण लहरींमागील विज्ञान, त्यांच्या ऐतिहासिक शोधाची पार्श्वभूमी, कृष्णविवरे, विश्वाची उत्पत्ती तसेच भौतिकशास्त्रातील मूलभूत नियम उलगडण्यातील या लहरींचे महत्त्व स्पष्ट करणार आहेत. तसेच भारतातील महत्त्वाकांक्षी ‘लायगो-इंडिया मेगा सायन्स प्रोजेक्ट’च्या वैज्ञानिक महत्त्वावरही ते प्रकाश टाकणार आहेत.
हे व्याख्यान सर्वसामान्य श्रोते, विद्यार्थी, संशोधक आणि विज्ञानप्रेमी नागरिकांसाठी खुले असून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे.