नांदेड :- पंडित दीनदयाळ उपाध्याय स्मृती प्रतिष्ठान, नांदेड यांच्या वतीने हजारो रसिकांच्या उपस्थितीत ‘नरेंद्र – देवेंद्र महोत्सव २०२६’ चे भव्य आयोजन करण्यात आले असून हा महोत्सव दोन दिवस रंगणार आहे. कै.चंद्रभागा केरबा गंजेवार नगरी, नवा मोंढा मैदान, नांदेड येथे हा उत्सव संपन्न होणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष शिवप्रसाद राठी व धर्मभूषण संयोजक धर्मभूषण अॅड. दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी, शनिवार २१ फेब्रुवारी २०२६ रोजी सायकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत १४ वा मराठी हास्य दरबार आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये पुण्याचे स्टँडअप कॉमेडीचे बादशहा बंडा जोशी, ‘झी हास्य सम्राट’ फेम सिद्धार्थ खिल्लारे (परभणी) आणि नांदेडचे लोकप्रिय शाहीर रमेश गिरी रसिकांचे मनोरंजन करणार आहेत. यावेळी ‘होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा’ हा विशेष कार्यक्रम सादर केला जाणार असून, ‘चला हवा येऊ द्या’ फेम सतीश कासेवाड हे कार्यक्रमाचे प्रस्तुतकर्ते असणार आहेत.विजेत्या पाच महिलांना पैठणी व वीस महिलांना आकर्षक भेट वस्तू देण्यात येणार आहॆ.
दुसऱ्या दिवशी, रविवार २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत २४ वे अखिल भारतीय विराट हिंदी कविसंमेलन होणार आहे. या कविसंमेलनात देशभरातील नामवंत कवी सहभागी होणार असून, यामध्ये मेरठ (उ.प्र.) येथील हास्य संचालक व क्रांती कवी सौरभ जैन सुमन, जबलपूरचे हास्य गीतकार सुदीप भोला, भिलवाडा(राजस्थान)चे हास्य व्यँग्य कवी दीपक पारेख, मैनपुरी (उ.प्र.) चे वीर रस कवी डॉ. मनोज चौहान, सुरत (गुजरात )येथील शृंगार रसाच्या कवयित्री सोनल जैन आणि दिल्लीच्या वीर रस कवयित्री नेहा शर्मा ‘नमन’ यांचा समावेश आहे.
या महोत्सवात चार वर्षाचे नांदेड भूषण पुरस्कार तसेच सुधाकर पत्र भूषण पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.हास्य, काव्य आणि सांस्कृतिक आनंदाचा हा महा उत्सव अनुभवण्यासाठी नांदेडकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शिवप्रसाद राठी व भाजपा जिल्हा सरचिटणीस धर्मभूषण अॅड. दिलीप ठाकूर यांनी केले आहे.